महाराष्ट्राने उत्कृष्ट सांघिक खेळ करीत संभाव्य विजेत्या हरयाणाला ४-१ असे पराभूत केले आणि वरिष्ठ राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली. अन्य लढतींमध्ये मुंबईने कर्नाटकवर २-१ असा विजय मिळवला तर कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) संघाने भोपाळचा ४-२ असा पराभव केला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने हरयाणाविरुद्ध पूर्वार्धात १-० अशी आघाडी मिळविली होती. महाराष्ट्राकडून विशाल पिल्ले, विनीत कांबळे, नवनीत स्वर्णकार व आशिष शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल केला. हरयाणाचा एकमेव गोल अर्जुनकुमार याने नोंदविला. महाराष्ट्राचा हा पहिलाच विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी सेनादलाला १-१ असे बरोबरीत रोखले होते.
मुंबईने कर्नाटकविरुद्ध मिळविलेल्या विजयात देविंदर वाल्मीकी व व्हिक्टोसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. कर्नाटककडून एकमेव गोल सोमण्णा प्रधानने केला. मुंबई संघाचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे. उत्तर प्रदेशने तामिळनाडूचा ६-२ असा पराभव केला व त्याचे श्रेय सुनील यादवने केलेल्या चार गोलांना द्यावे लागेल.
 ओडिशाच्या गंगापूर संघाने झारखंड संघाचा ४-२ असा पराभव केला. पूर्वार्धात दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत होते. ओडिशा संघाकडून रोशन मिंझ याने दोन गोल केले तर बिकाश टोप्पो व विल्सन मिंझ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. झारखंड संघाचे दोन्ही गोल चंद्रशेखर झाल्क्सो याने केले. कॅग संघाने भोपाळविरुद्ध पूर्वार्धात ३-० अशी आघाडी मिळविली होती. कॅग संघाकडून इम्रान खान याने दोन गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. महंमद नईमउद्दीन व चंदनसिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. भोपाळकडून ओसाफ उर रहेमान याने दोन्ही गोल करीत चिवट झुंज दिली.