केदार जाधवचे शतक

केदार जाधवने कर्णधारपदाला साजेसा खेळ करताना झंझावती शतक ठोकले. त्यामुळेच महाराष्ट्राला विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्रिपुराविरुद्ध १११ धावांनी मोठा विजय मिळवता आला.
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्वबाद २९४ धावा केल्या. त्यामध्ये केदारने ९० चेंडूंत केलेल्या तडाखेबाज १३१ धावांचा मोठा वाटा होता. त्याने केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या विजयाचा पाया रचला गेला. बदली गोलंदाज म्हणूनच काम करणाऱ्या स्वप्निल गुगळेने चार बळी व एका फलंदाजाला धावचीत करीत महाराष्ट्राच्या विजयात आपलाही महत्त्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीपुढे त्रिपुराचा डाव ४९.५ षटकांत १८३ धावांत कोसळला.
महाराष्ट्राकडून खूप मोठी भागीदारी झाली नाही तथापि पहिल्या फळीत हर्षद खडीवाले (३२), गुगळे (२७) व विशांत मोरे (३१) यांनी महाराष्ट्रास चांगला पाया मिळवून दिला. केदार याने राहुल त्रिपाठी (१९) याच्या साथीत सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची भर घातली. त्यानंतर केदारने एकहाती खेळ करीत चौफेर फटकेबाजी केली. त्याने १११ मिनिटांमध्ये केलेल्या १३१ धावांमध्ये १७ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. या मोसमातील त्याचे हे दुसरे शतक आहे. त्याने ओदिशाविरुद्धच्या रणजी सामन्यात शतक टोलवले होते.
विजयासाठी २९५ धावांच्या लक्ष्यास सामोरे जाताना त्रिपुराची एक वेळ ७ बाद ९१ अशी स्थिती होती. संजय मजुमदार व राणा दत्ता यांनी केलेल्या ७५ धावांच्या भागीदारीमुळेच त्रिपुरास १८३ धावांपर्यंत मजल गाठता आली. मजुमदारने ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा केल्या. राणाने दमदार २६ धावा केल्या. महाराष्ट्राकडून गुगळेने ४० धावांमध्ये ४ बळी घेतले. अक्षय दरेकर व निकित धुमाळ यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली. महाराष्ट्राचा या स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय आहे. दुसऱ्या सामन्याअखेर त्यांचे आठ गुण झाले आहेत.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ४९.४ षटकांत सर्वबाद २९४ (केदार जाधव १३१, स्वप्निल गुगळे २७, हर्षद खडीवाले ३२, विशांत मोरे ३१; राजेश बनिक ४/४०, संजय मजुमदार ३/५३) वि.वि. त्रिपुरा : ४९.५ सर्वबाद १८१ (संजय मजुमदार नाबाद ५२, राणा दत्ता २६; स्वप्निल गुगळे ४/२१, निकित धुमाळ २/३६, अक्षय दरेकर २/२०)