ग्रँडमास्टर के.शशिकिरण हा चौथ्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला एक लाख ७० हजार रुपयांची बोली लाभली. महिलांमध्ये पद्मिनी राऊतने सर्वाधिक एक लाख ६१ हजार रुपयांची बोली मिळविली. ही स्पर्धा ११ ते १५ जून या कालावधीत येथे आयोजित केली जाणार आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. शशिकिरण याच्यासाठी ७५ हजार रुपये आधारभूत किंमत ठरविण्यात आली होती. अहमदनगर संघाने त्याला आपल्या चमूत दाखल करून घेतले. ग्रँडमास्टर बी. अधिबनलाही चांगला भाव मिळाला. त्याच्यावर पुणे-सांगली नेव्हिगेटर्स या नवोदित संघाने दीड लाख रुपयांची बोली लावली. याच संघाने ग्रँडमास्टर अभिजित कुंटेसाठी एक लाख रुपयांचे मानधन देत आपल्याकडे खेचून घेतले. पुणे ड्रय़ुमास्टर्स संघाने ग्रँडमास्टर एस.पी.सेतुरामन याला एक लाख ८ हजार ९०० रुपयांची बोली लावून ताफ्यात दाखल करून घेतले. माजी राष्ट्रीय विजेता अभिजित गुप्ताला मुंबई मूव्हर्स संघाने एक लाख ४० हजार रुपयांचे किमतीवर खरेदी केले. याच संघाने आर.वैशालीला एक लाख तीन हजार रुपयांचे मानधनावर खरेदी केले. वैशाली हिला गतवर्षी कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.

महिलांमधील अव्वल दर्जाची खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला सर्वाधिक भाव मिळेल अशी अपेक्षा होती. तिला जळगाव बॅटलर्स संघाने एक लाख ३८ हजार रुपयांचे बोलीवर विकत घेतले. तिच्या तुलनेत पद्मिनी राऊत व ईशा करवडे यांना चांगले मानधन मिळाले. पद्मिनी हिला ठाणे काँबेटंट्स संघाने विकत घेतले. ईशा हिच्यासाठी एक लाख ५८ हजार रुपयांची बोली लावून पुणे ड्रय़ुमास्टर्स संघाने खरेदी केले. अहमदनगर संघाने नगरचा ग्रँडमास्टर शार्दूल गागरे याला ७२ हजार रुपयांच्या मानधनावर स्वत:कडेच ठेवले. महाराष्ट्राचा आणखी एक ग्रँडमास्टर स्वप्नील धोपाडे याच्यासाठी जळगाव संघाने सव्वा लाख रुपये मोजले.