उत्कंठापूर्ण लढतीत पुणे सांगली नेव्हिगेटर्स व पुणे ट्रमास्टर्स या पुण्याच्या संघांनी आकर्षक विजय मिळविला आणि पर्सिस्टंट महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये पहिला दिवस गाजविला. पहिल्याच दिवशी काही अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे शनिवारपासून या स्पर्धेस प्रारंभ झाला. पुणे सांगली नेव्हिगेटर्स संघाने ठाणे कॉम्बॅटंट्स संघावर ४-२ अशी मात केली. या लढतीत ठाण्याच्या अरविंद चिदम्बरमने पुण्याच्या ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला पराभवाचा धक्का दिला, तर ठाण्याच्या सौम्या स्वामीनाथनला पुण्याच्या आकाश ठाकूर याने पराभूत करीत आश्चर्यजनक विजयाची नोंद केली. पुणे ट्रमास्टर्स संघाने मुंबई मूव्हर्स संघाचा ३.५-२.५ असा पराभव केला. त्या वेळी त्यांच्याकडून हर्षित राजा या उदयोन्मुख खेळाडूने महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटेला चकित केले.
जळगाव बॅटलर्स संघाने अहमदनगर चेकर्स संघावर ३.५-२.५ असा विजय मिळविला. या लढतीत नगरच्या शार्दूल गागरेने भारताची अव्वल दर्जाची महिला खेळाडू कोनेरू हंपीवर सनसनाटी विजय नोंदविला. जळगाव संघाकडून एस.एल. नारायणनने कृष्णन शशीकिरण याच्यावर मात करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

सविस्तर निकाल
१. पुणे सांगली नेव्हिगेटर्स वि.वि. ठाणे कॉम्बॅटंट्स (४-२)-अभिजित कुंटे पराभूत वि. अरविंद चिदम्बरम, आदित्य उदेशी वि.वि. पद्मिनी राऊत, व्ही. व्हर्शिनी बरोबरी वि. अनिरुद्ध देशपांडे, आकाश ठाकूर वि.वि. सौम्या स्वामीनाथन, भास्कर अधिबन बरोबरी वि. एम.आर. ललितबाबू, मेरी अ‍ॅन गोम्स वि.वि. अभिमन्यू पुराणिक.
२. पुणे ट्रमास्टर्स वि.वि. मुंबई मूव्हर्स (३.५-२.५) स्वयंम मिश्रा वि.वि. राकेश कुलकर्णी, हर्षित राजा वि.वि. स्वाती घाटे, ऋचा पुजारी पराभूत वि. अभिजित गुप्ता, एस.पी. सेतुरामन वि.वि. आर. वैशाली, व्ही. विष्णुप्रसन्ना पराभूत वि. दीप्तायन घोष, ईशा करवडे बरोबरी वि. विक्रमादित्य कुलकर्णी.
३. जळगाव बॅटलर्स वि.वि. अहमदनगर चेकर्स (३.५-२.५)- कोनेरू हंपी पराभूत वि. शार्दूल गागरे, मोहम्मद शेख बरोबरी वि. तानिया सचदेव, श्रीनाथ नारायणन वि.वि. पवन दोडेजा, आकांक्षा हगवणे पराभूत वि. सागर शहा, स्वप्निल धोपाडे वि.वि. भक्ती कुलकर्णी, एस.एल. नारायणन वि.वि. कृष्णन शशीकिरण.

ऑलिम्पिकसाठी तिरंदाजांना आज संधी
पीटीआय, अन्ताल्या
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरुष तिरंदाजांना येथे रविवारी अखेरची संधी मिळणार आहे. येथे जागतिक
चषक मालिकेतील तिसरी स्पर्धा होणार आहे.
भारतीय संघात जयंता तालुकदार, मंगलसिंग चंपिया, अतनु दास व राहुल बॅनर्जी यांचा समावेश आहे. या संघाने या मालिकेतील पहिल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळविले होते. तालुकदार व चंपिया यांनी यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. अतनुला अद्याप ऑलिम्पिकमध्ये भाग घेता आलेला नाही.
भारतीय संघाला जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वीच ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे.