अभिजित गुप्ता, अभिजित कुंटे, परिमार्जन नेगी, दीप सेनगुप्ता, बी. अधिबन यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाची महाराष्ट्र बुद्धिबळ लीग स्पर्धा अतिशय चुरशीने खेळली जाईल अशी अपेक्षा आहे. ११ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी येथे होणार आहे.
माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याच्या उपस्थितीत हा लिलाव होणार आहे. तसेच स्पर्धेचे औपचारिक उद्घाटनही याच वेळी केले जाणार आहे. यंदा या लिलावात ६३ खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामध्ये १६ ग्रँडमास्टर, १५ आंतरराष्ट्रीय मास्टर, नऊ महिला ग्रँडमास्टर, २० आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू व दहा अनुभवी महिला खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये आशियाई रौप्यपदक विजेता बी. अधिबन, एस. पी. सेतुरामन यांचाही सहभाग निश्चित झाला आहे. मात्र गतवर्षी सर्वाधिक बोली लाभलेला खेळाडू सूर्यशेखर गांगुली हा परदेशातील स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे तो येथे खेळू शकणार नाही.
ही स्पर्धा गतविजेता पुणे अॅटॅकर्स, ठाणे कॉम्बटन्ट्स, अहमदनगर चेकर्स, गतवर्षीचा उपविजेता जळगाव बॅटलर्स, मुंबई मूव्हर्स, पुणे ट्र मास्टर्स या सहा संघांमध्ये होणार आहे. गतवर्षी सहभागी झालेल्या नागपूर रॉयल्स संघाने माघार घेतली असून त्याऐवजी पुणे ट्र मास्टर्स संघास संधी देण्यात आली आहे. या संघांनी गतवर्षीच्या खेळाडूंपैकी आर. ललितबाबू (पुणे अॅटॅकर्स), अभिमन्यू पुराणिक (ठाणे), शार्दूल गागरे (अहमदनगर), नारायण श्रीनाथ व प्रतीक पाटील (जळगाव), अनुप देशमुख व राकेश कुलकर्णी (मुंबई) या खेळाडूंना त्यांच्या संघांनी या वर्षीही आपल्याकडे ठेवले आहे.

बुद्धिबळ लीग संकल्पनेचे कौतुक करीत आनंद म्हणाला, की युरोपीयन देशांमध्ये अशा लीग सतत होत असतात. त्याचा फायदा खेळाडूंचा अनुभव समृद्ध होण्यासाठी निश्चित होतो. गतवर्षी महाराष्ट्र लीग स्पर्धा अतिशय उत्साहात झालेली मी पाहिली आहे. ही स्पर्धा आयोजित करणारे संघटक कौतुकास पात्र आहेत.
विश्वनाथन आनंद,  माजी विश्वविजेता