दृष्टिहीन खेळाडूंच्या स्पर्धेसाठी मुळातच प्रायोजक मिळणे कठीण असते. साहजिकच पात्रता पूर्ण केलेले पंच मिळणे त्याहून अवघड आहे, हे लक्षात आल्यानंतर बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पंच होण्याच्या निर्धाराने येथील अंशत: दृष्टिहीन खेळाडू सदानंद जन्नू याने नुकतीच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने घेतलेली खुल्या गटाच्या पंच परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
स्टेट बँकेत नोकरी करणारा सदानंद हा राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिलाच दृष्टिहीन खेळाडू आहे. दृष्टिहीन खेळाडूंसाठी खूपच कमी स्पर्धा होतात तसेच अशा स्पर्धाकरिता पंच मिळणेही कठीण असते, हे लक्षात आल्यानंतर सदानंदने पंचपरीक्षा देण्याचे ठरविले. खेळातील त्याचे प्रशिक्षक धनाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या परीक्षेची तयारी केली. नुकत्याच झालेल्या राज्य पंचपरीक्षेत ३२ जणांनी भाग घेतला होता. त्यामध्ये सदानंद हा एकमेव दृष्टिहीन खेळाडू होता. त्याने या परीक्षेत पंधरावे स्थान मिळविले.
परीक्षेच्या तयारीविषयी सदानंद म्हणाला, ‘‘१९९५मध्ये कोरेगाव पार्क येथील पूना होम फॉर ब्लाइन्ड येथे शिकत असताना वसतिगृहात मला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. तेथे डॉ. शंकर माचवे यांच्या प्रेरणेने व काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मला जिल्हा स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. तेथूनच माझ्या खेळाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. गेली दहा वर्षे मी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत आहे. या स्पर्धेत भाग घेत असतानाच आपण पंचांचे काम शिकले पाहिजे अशी मी मनाशी खूणगाठ बांधली.’’
पंच परीक्षा देताना कोणत्या अडचणी आल्या, या प्रश्नाला उत्तर देताना सदानंद म्हणाला, ‘‘१०० गुणांची लेखी परीक्षा व २० गुणांची तोंडी परीक्षा होती. प्रामुख्याने खेळातील नियम व प्रत्यक्ष खेळताना निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी हे प्रश्न होते. पूर्वतयारी चांगली झाली असल्यामुळे अडचण आली नाही. आंतरराष्ट्रीय पंच
राजेंद्र शिदोरे यांनी तोंडी परीक्षेत प्रत्यक्ष खेळताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न विचारले व मी त्याची योग्य उत्तरेही दिली.’’
सदानंद याने राज्य शास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. हा अभ्यास करण्यासाठी व त्याच्या कारकीर्दीसाठी त्याला आईवडिलांचे बहुमोल प्रोत्साहन मिळाले. त्याचे वडील दृष्टिहीन असून फटाक्याचा बाण डोळ्यात गेल्यामुळे त्याच्या आईचा एक डोळा निकामी झाला आहे. त्याचा भाऊ दृष्टिहीन आहे. तरीही त्याला घरातून संपूर्ण सहकार्य मिळाले आहे.
सदानंद हा संगणक उत्तम प्रकारे चालवित असल्यामुळे परीक्षेची तयारी त्याने त्याद्वारे केली. स्पर्धेसाठी सामन्यांची कार्यक्रमपत्रिका तयार करणे, संगणकावर निकाल टाकणे आदी अनेक कामे तो सहज करतो. काळे व पांढरे मोहरे अशी विभागणी करणे त्याच्यासाठी थोडेसे कठीण काम आहे, मात्र हळूहळू त्यातही वाकबगार होण्याची त्याला खात्री आहे.
बुद्धिबळाची कारकीर्द करण्यासाठी लागणारे पैसे जमविण्यासाठी सदानंदने आपल्यासारख्या अन्य नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्टेट बँकेत नोकरी मिळाल्यानंतर त्याने आपल्या खेळाच्या व पंचांच्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय पंच होण्याचे आपले ध्येय लवकरच साकार होईल, अशी त्याला खात्री आहे.