मर्यादित षटकांच्या सामन्यांचे प्राबल्य वाढत असतानाच क्रिकेटमध्ये कसोटीस अजूनही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कसोटी सामना पाहण्याचे पुणेकरांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) बांधलेल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमला आता कसोटी केंद्राचा दर्जा लाभला आहे. प्रेक्षकांसाठी मर्यादित जागा, तसेच खेळाडूंची सुरक्षाव्यवस्था, वाहनव्यवस्था यादृष्टीने दिवसेंदिवस नेहरू स्टेडियम अपुरे पडू लागल्यानंतर एमसीएने गहुंजे येथे स्वत:च्या मालिकेचे आंतरराष्ट्रीय दर्जा लाभलेले स्टेडियम बांधले. एप्रिल २०१२ मध्ये हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खुले झाले. २०११-१२च्या रणजी मोसमातील हरयाणाविरुद्ध महाराष्ट्राच्या सामन्याने हे स्टेडियम राष्ट्रीय स्तरावर आले. २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धचा ट्वेन्टी२० सामना तेथे आयोजित करण्यात आला व या सामन्याद्वारे हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात झळकले. पाठोपाठ २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाबरोबरचा एकदिवसीय सामना येथे आयोजित करण्यात आला. पंचतारांकित हॉटेल्सची उपलब्धी, मुंबईपासून अतिशय सोयीचे अंतर यामुळे या स्टेडियमवर कसोटी सामना आयोजित करणे शक्य आहे, असा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तांत्रिक समितीने दिल्यानंतर या स्टेडियमवर कसोटी सामना आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला.