महाराष्ट्राचा डाव ५ बाद ५४३ धावसंख्येवर घोषित; नौशाद शेखचे शतक

कर्णधार अंकित बावणेचे नाबाद द्विशतक आणि नौशाद शेखच्या शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने गुरुवारी पहिल्या डावात ५ बाद ५४३ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या क-गटात महाराष्ट्राने २५० धावांच्या आघाडीसह ओदिशाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक विजयाकडे वाटचाल केली आहे.

महाराष्ट्राने २ बाद २१९ धावसंख्येवरून पहिल्या डावात पुढे प्रारंभ केला. बुधवारचा शतकवीर ऋतुराज गायकवाडने अंकितच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी २११ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. देवव्रत प्रधानने ऋतुराजला (२१७ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १२९ धावा) बाद करून ही जोडी फोडली. मग अंकितने नौशाद शेखच्या साथीने चौथ्या गडय़ासाठी १८० धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राच्या डावाला आकार दिला.

नौशादचे (१५७ चेंडूंत ७ चौकारांसह १०० धावा) शतक होताच अभिषेक राऊतने त्याला तंबूची वाट दाखवली. मग अंकितने राहुल त्रिपाठीच्या (४८ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावा) साथीने पाचव्या गडय़ासाठी ११४ धावांची भागीदारी केली. प्रधाननेच ही जोडी फोडण्यात यश मिळवले. राहुल बाद होताच अंकितने महाराष्ट्राचा पहिला डाव घोषित केला. अंकितने ४०६ चेंडू हिमतीने किल्ला लढवताना २१ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २०४ धावा केल्या.

उत्तरार्धात ओदिशाने दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावा केल्या असून, शतांशू मिश्रा आणि अनुराग सारंगी अनुक्रमे १४ आणि १० धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक

*  ओदिशा (पहिला डाव) : २९३

*  महाराष्ट्र (पहिला डाव) : १४९.५ षटकांत ५ बाद ५४३ डाव घोषित (ऋतुराज गायकवाड १२९, अंकित बावणे नाबाद २०४, नौशाद शेख १००; सूर्यकांत प्रधान २/९२)

*  ओदिशा (दुसरा डाव) : बिनबाद २४