आज उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना केरळशी; रेल्वे, हरयाणा, सेनादल बाद फेरीत

रोहा : राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या साखळीचा सोपा पेपर महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला. स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने गुजरातला ६०-२७ असे नामोहरम करीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे अ-गटातून विजेत्याच्या रूबाबात महाराष्ट्राने उपउपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली आहे. बुधवारपासून बाद फेरीच्या अग्निपरीक्षेला सुरुवात होत असून, महाराष्ट्राची गाठ केरळशी पडणार आहे.

दत्ताजीराव ग. तटकरे क्रीडानगरीत झालेल्या अ-गटातील साखळी लढतीत महाराष्ट्राने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळवताना चौथ्या मिनिटालाच गुजरातवर लोण चढवला. मग नवव्या आणि १३व्या मिनिटाला आणखी दोन लोण चढवले. त्यामुळे मध्यंतराला ४२-९ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात गुजरातने अधिक ताकदीने प्रतिकार केल्यामुळे महाराष्ट्राने २२व्या मिनिटाला दिलेल्या लोणनंतर गुजरातनेसुद्धा एक लोण चढवण्यात यश मिळवले.

महाराष्ट्राच्या गुणसंख्येत तुषार पाटील (७ चढायांमध्ये १० गुण), अभिषेक भोजने (८ चढायांमध्ये १० गुण), रिशांक देवाडिगा (१० चढायांमध्ये ९ गुण) आणि अजिंक्य पवार (८ चढायांमध्ये ९ गुण) या चौघांच्या दमदार आक्रमणाने महत्त्वाची भूमिका बजावली. तुषार आणि अभिषेकने दोनदा अव्वल चढाया करीत प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय विकास काळे आणि विशाल माने यांनी प्रत्येकी दोन पकडी केल्या.

..तर राष्ट्रीय स्पर्धाच झाली नसती!

अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय स्पध्रेचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेवर होती. विविध राज्यांमधून येणाऱ्या संघांना रेल्वे तिकीट दरात सवलत मिळते. मात्र इतक्या कमी कालावधीत या संदर्भातील प्रक्रिया करणे कठीण होते. त्यामुळे हा भरुदड सहन करणे कठीण आहे, असे कारण दाखवीत आता राष्ट्रीय स्पर्धाच पुढे ढकलावी, अशी मागणी काही राज्यांनी केली होती. पण राज्य कबड्डी संघटनेने अन्य राज्य संघटनांवर पडलेला हा तिकीट रकमेचा अतिरिक्त भार पेलण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे ही स्पर्धा होऊ शकली, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

अजय ठाकूरची माघार

पद्मश्री पुरस्कार घोषित झालेला हिमाचल प्रदेशचा कबड्डीपटू अजय ठाकूरला राष्ट्रीय स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. दोन वर्षांपूर्वी भारताला विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या अजयची गेल्या वर्षी हिमाचल प्रदेश पोलीस दलात पोलीस उपाधीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. परंतु आशियाई क्रीडा स्पर्धा आणि प्रो कबड्डी लीगच्या हंगामामुळे त्याला प्रशिक्षण पूर्ण करता आले नव्हते. मात्र आणखी विलंब झाला असता तर त्याला पदभार स्वीकारणे कठीण झाले असते. त्यामुळे हिमाचल प्रदेश पोलीस दलाने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, अशी माहिती हिमाचल प्रदेश संघाचे प्रशिक्षक गोपाल दास्ता यांनी दिली.

प्रशिक्षकांना योग्य स्थान

स्पध्रेच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षकांना मॅटपासून काही अंतरावर खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सामन्यांचे मॅट हे जमिनीपासून अडीच फूट वर बसवण्यात आले असल्यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडू यांना संवाद साधणे कठीण जात होते. याबाबत काही प्रशिक्षकांनी तक्रार केली होती. मात्र तांत्रिक समन्वय जगदीश्वर यादव यांनी निर्देश देत स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी प्रशिक्षकाला मॅटवरच खुर्चीची व्यवस्था करण्यात आली.