अनुभवी खेळाडूंचा सहभाग व प्रशिक्षण शिबिराद्वारे मार्गदर्शन याच्या जोरावर महाराष्ट्राचे खेळाडू केरळमध्ये ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेत अग्रस्थान मिळवतील, असा आत्मविश्वास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी व्यक्त केला.
‘‘गतवेळी रांची येथे महाराष्ट्राने पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवताना ४१ सुवर्ण, ४४ रौप्य, ४७ कांस्य अशी एकूण १३२ पदकांची कमाई केली होती. महाराष्ट्राची मुख्य मदार नेमबाजी, वेटलिफ्टिंग, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, हॉकी, रग्बी आदी क्रीडाप्रकारांतील खेळाडूंवर आहे. जलतरणात आंतरराष्ट्रीय खेळाडू वीरधवल खाडे याच्याकडूनच किमान सहा सुवर्णपदकांची आशा आहे. नेमबाजीत ऑलिम्पिकपटू अंजली भागवत, राही सरनोबत यांच्यासह तेजस्विनी पंडित, दीपाली देशपांडे, अशोक पंडित, रौनक पंडित यांच्यावर भिस्त आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये कविता राऊत, कृष्णकुमार राणे, ललिता बाबर, सिद्धार्थ थिंगलिया यांच्याकडून भरघोस पदकांची आशा आहे,’’ असे लांडगे यांनी सांगितले.
कुस्तीमध्ये अंकिता गुंड, रेश्मा माने, मनीषा दिवेकर, विक्रम कुऱ्हाडे तर जिम्नॅस्टिक्समध्ये वंदिता रावळ, श्रावणी राऊत, श्रद्धा तळेकर, निष्ठा शहा यांच्यावर महाराष्ट्राची मदार आहे. अभिनंदन भोसले, राजेंद्र सोनी, ऋतुजा सातपुते, अरविंद पनवर (सायकलिंग), माधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे (टेबल टेनिस) यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा आहे.
‘‘या स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या सराव शिबिरे, खेळाडूंचा दैनंदिन भत्ता याकरिता एक कोटी ७० लाख रुपयांचे अंदाजपत्रक राज्य शासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने एक कोटी १० लाख रुपये द्यायची तयारी दर्शविली आहे. आतापर्यंत शासनाने ५८ लाख रुपयांची रक्कम एमओएकडे पाठविली असून, उर्वरित रकमेसाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत,’’ असेही लांडगे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या खेळाडूंना पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी महाराष्ट्र पथकाचे उपप्रमुख नामदेव शिरगावकर, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित होते.