कबड्डीमधील महाराष्ट्राच्या अपयशाला खेळाडूंची बेशिस्त हे प्रमुख कारण असून, खेळाडूंना आणि त्यांच्याशी संबंधित सर्वाना आचारसंहिता लावण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी १४व्या कबड्डीदिनानिमित्त केली. तुळजापूर येथे झालेल्या या शानदार कार्यक्रमात खेळाडू, कायकर्ते, सामनाधिकारी आणि क्रीडा पत्रकार आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. मधू पाटील स्मृती पुरस्कार सांगलीच्या काशिलिंग आडकेला, तर अरुणा साटम स्मृती पुरस्कार अभिलाषा म्हात्रेला प्रदान करण्यात आला.
‘‘सध्या कबड्डीमध्ये मॅट अनिवार्य झाले असून, अजूनही आपण कुठेतरी कमी पडतो. त्याकरिता किशोर आणि कुमार गटातील खेळाडूंना मॅटवर जास्तीत जास्त सराव द्यायला हवा. ज्यामुळे महाराष्ट्राला खुल्या गटाकरिता अधिकाधिक चांगले खेळाडू उपलब्ध होतील. उत्तरेत लोकप्रिय असलेला सर्कल कबड्डी हा काय प्रकार आहे, ते जाणून घेतले पाहिजे. बीच कबड्डीच्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ लागल्या आहेत. किनारपट्टी भागात हा खेळ वाढीस लागला आहे. राज्याच्या इतर भागांतही तो खेळला गेला तर महाराष्ट्राला संघ निवडताना भरपूर वाव मिळेल,’’ असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘कबड्डीमध्ये अन्य राज्यांनी मोठी प्रगती केली असून, महाराष्ट्राला गतवैभव मिळवायचे असेल, तर प्रथम दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.’’