गतविजेत्या हरयाणाला मागे टाकत एकूण २२८ पदकांसह अव्वल स्थान

म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या दुसऱ्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेत यंदा महाराष्ट्राचा जयजयकार झाला. महाराष्ट्राने गतविजेत्या हरयाणाला मागे टाकत सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी घातली. हरयाणाला द्वितीय आणि दिल्लीला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या खात्यावर ८५ सुवर्ण, ६२ रौप्य आणि ८१ कांस्य अशी एकूण २२८ पदके जमा होती. महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख विजय संतान यांच्यासह खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला.

शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन सभागृहात झालेल्या समारोप सोहळ्यात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘‘खेलो इंडियाच्या विविध स्पर्धामध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू अभिनंदनास पात्र आहेत आणि जे स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांचेही विशेष अभिनंदन! ‘खेलेगा इंडिया, तो खिलेगा इंडिया.’ शाळांमध्ये पाठय़पुस्तकी अभ्यासक्रम खूप आहे, परंतु खेळ नाहीत. म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की, आगामी काळात प्रत्येक शाळेत खेळाचा एक तास नक्की असेल.’’

राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे म्हणाले, ‘‘खेलेगा महाराष्ट्र, तो खेलेगा राष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे मी आभार मानतो, त्यांनी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे आयोजन करण्याची संधी दिली. देशभरातून येथे खेळाडू आले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी शाळेच्या ५५ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.’’

याशिवाय पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय क्रीडासचिव राहुल भटनागर, राज्याच्या शिक्षण व क्रीडाखात्याच्या सहसचिव वंदना कृष्णा, दीपक भायसेकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव ओंकार सिंग, चैतन्य दिवाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

टेबल टेनिसमध्ये सृष्टीला कांस्यपदक

महाराष्ट्राच्या सृष्टी हळगेंडीला २१ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला कांस्यपदक मिळाले. मुलांच्या १७ वर्षांखालील दुहेरीत महाराष्ट्राच्या हृषिकेश मल्होत्रा व दीपित पाटील या जोडीला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ‘‘ भारतीय संघात स्थान मिळवण्याचे माझे ध्येय असून ते साकार करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. मला पालकांकडून भरपूर प्रोत्साहन मिळत आहे,’’ असे सृष्टीने सांगितले.

तिरंदाजीत साक्षी, ईशाचा सुवर्णवेध

एकाग्रता व जिद्द यांचा सुरेख समन्वय राखून साक्षी शितोळे व ईशा पवार या महाराष्ट्राच्या कन्यांनी तिरंदाजीमध्ये सुवर्णवेध घेतला. प्रथमेश जावकरचे सुवर्णपदक केवळ एका गुणाने हुकले. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत साक्षीने २१ वर्षांखालील मुलींच्या विभागात रिकव्‍‌र्ह प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम फेरीत पश्चिम बंगालच्या सुपर्णा सिंगला ६-० अशा फरकाने हरवले.

स्पर्धेतील यशाबाबत साक्षी म्हणाली, ‘‘खेलो इंडियात सुवर्णपदकाची मला खात्री होती. हे विजेतेपद माझ्या कारकीर्दीसाठी खूप महत्त्वाचे आहे.’’

मुलींच्या १७ वर्षांखालील गटात ईशाने कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक राखले. तिने १५० गुणांपैकी १४५ गुणांची कमाई करीत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात प्रथमेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १५० गुणांपैकी १४२ गुण मिळविले. दिल्लीच्या ऋतिक चहलने १४३ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. उत्कंठापूर्ण लढतीत त्याने ऋतिकला चिवट झुंज दिली,