छत्तीसगडचीही निराशाजनक सुरुवात

अव्वल फलंदाजांनी केलेली हाराकिरी आणि राहुल त्रिपाठीने झळकावलेले शतक तसेच तळाच्या अनुपम संकलेचा याने दिलेली झुंज यामुळे छत्तीसगडने महाराष्ट्राचा पहिला डाव २३९ धावांवर संपुष्टात आणला. मात्र पहिल्या दिवसअखेर छत्तीसगडचीही ३ बाद २३ अशी स्थिती झाली आहे.

रायपूर येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपेशल निराशा केली. स्वप्निल गुगळे आणि चिराग खुराना यांनी ३६ धावांची सलामी दिल्यानंतर महाराष्ट्राचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. ऋतुराज गायकवाड, अव्वल फलंदाज केदार जाधव आणि अंकित बावणे यांना तर खातेही खोलता आले नाही. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली होती. अखेर राहुल त्रिपाठी महाराष्ट्रासाठी धावून आला.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या राहुलने ७ बाद ९१ अशा स्थितीतून अनुपम संकलेचा याच्या साथीने महाराष्ट्राचा डाव सावरला. या दोघांनी आठव्या गडय़ासाठी १०८ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राला २०० धावांच्या जवळ आणून ठेवले.

राहुलने १४५ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि १ षटकारासह १०२ धावांची खेळी केली. त्याला उत्तम साथ देताना संकलेचाने १० चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राचे चार फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले. त्यामुळे त्यांचा डाव २३९ धावांवरच गडगडला. छत्तीसगडकडून विशाल खुशवाहने चार तर पंकज रावने तीन बळी मिळवले.

प्रत्युत्तरादाखल, यजमान छत्तीसगडचीही सुरुवात खराब झाली. अनुपम संकलेचाने छत्तीसगडच्या पहिल्या तीन फलंदाजांना माघारी पाठवत महाराष्ट्राला या सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यामुळे एका क्षणी छत्तीसगडची ३ बाद १४ अशी स्थिती झाली होती. हरप्रीत सिंग आणि अजय मंडल यांनी अखेरची षटके खेळून काढली तरी छत्तीसगड पहिल्या दिवसअखेर ३ बाद २३ अशा संकटात सापडला आहे.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : ६८.३ षटकांत सर्व बाद २३९ (राहुल त्रिपाठी १०२, अनुपम संकलेचा ६६; विशाल खुशवाह ४/५९, पंकज राव ३/३२)

छत्तीसगड (पहिला डाव) : १० षटकांत ३ बाद २३ (हरप्रीत सिंग खेळत आहे १३; अनुपम संकलेचा ३/११).