राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत पदक विजेते महाराष्ट्रातील खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात धनादेशांचे वाटप करून गौरवण्यात आले. यावेळी आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील क्रीडा संकुले आहेत, परंतु त्यांचा आढावा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत महाराष्ट्राच्या पाच खेळाडूंनी पदके मिळवली. सुवर्णपदक विजेती महिला नेमबाज राही सरनोबतला ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रमाणे रौप्यपदक विजेत्या नेमबाज आयोनिका पॉलला ३० लाख रुपये देण्यात आले. तसेच ओंकार ओतारी, गणेश माळी आणि चंद्रकांत माळी या कांस्यपदक विजेत्या वेटलिफ्टर्सना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यस्त असल्यामुळे राही वगळता अन्य चारही खेळाडू कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाही, परंतु त्यांच्या पालकांनी हा सत्कार स्वीकारला.