खपाशीला गेलेले पोट, अश्रूही आटलेले डोळे, शून्यात हरवलेली दृष्टी, कर्दमलेला सदरा, साधी विजार आणि पायात स्लिपर घातलेले पाच फूट उंचीचे महाराष्ट्राचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीपटू मारुती नाईक सध्या आयुष्याची लढाई लढत आहेत. एकेकाळी कुस्तीची मैदाने गाजवणारे नाईक १९९५मध्ये मोरारजी मिल बंद पडल्यामुळे देशोधडीला लागले. सध्या कोल्हापूरच्या चंदवड तालुक्यामध्ये मिळतील ती हलकीसलकी कामे करून त्यांना आपला चरितार्थ चालवावा लागत आहे. डिलाइल रोडच्या ललित कला भवनात महाराष्ट्र राज्य कामगार कुस्ती स्पर्धेचा थरार एकीकडे सुरू असताना नाईक यांनी आवर्जून या स्पध्रेला हजेरी लावली. त्यावेळी पोटाची खळगी भरण्यासाठीचे आजचे धगधगते जगणे आणि मैदान गाजवतानाच्या जुन्या आठवणींचा पट त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
पाच भाऊ आणि चार बहिणी असा भला मोठा परिवार. त्यामुळे फार कमी वयात मारुती यांना नोकरी करावी लागली. १९७५साली त्यांनी मुंबई गाठली. कुस्तीचे वेड होते. गतवैभवाच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले मारुतीराव आपला प्रवास उलगडताना सांगतात की, ‘‘डिलाइल रोडच्या इराणी चाळीत नातलगांकडे राहून छोटी-मोठी नोकरी करत होतो, पण कुस्ती सोडली नव्हती. याच कुस्तीच्या जोरावर मला मोरारजी मिलमध्ये १९७७ साली नोकरी मिळाली आणि आयुष्याला दिशा मिळाल्यासारखे वाटले. कामगार कुस्ती स्पर्धा, जिल्हा, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धामध्ये एकामागून जिंकत होतो. ५७ किलो वजनी गटात असलो तरी ६५ किलो वजनी गटातील मल्ल मला घाबरायचे, कुणीही समोर यायला तयार नसायचे, या कामगिरीच्या जोरावरच मला १९८३मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.’’  
‘‘शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यावर मी थांबलो नाही, अधिक जोमाने खेळायला लागलो. पण १९९५ साली मिल बंद झाली आणि मी उघडय़ावर पडलो, मुंबईत राहायचा प्रश्नही बिकट होताच. त्यामुळे मी पुन्हा एकदा चंदगड गाठले. मला मुलगा असता तर मी त्याला मल्ल बनवला असता, पण मला अपत्य नाही. चंदगडमधील तरुणांना मी कुस्ती शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कुस्तीमध्ये कारकीर्द घडू शकेल असे वाटत नाही. त्यापेक्षा फूटबॉल आणि क्रिकेट खेळायला त्यांना आवडते. सध्याच्या घडीला मी पोटाची खळगी भरण्यासाठी छोटीमोठी कामे करतो, दिवसाला शंभर रुपये मिळतात, त्यावर सध्या गुजराण होते. मुंबईत मिल कामगारांच्या घरासाठी अर्ज केला आहे, पण अजूनही पदरी काहीही पडलेले नाही,’’ असे भरलेल्या डोळ्यांनी मारुतीराव सांगत होते.