पतंग उडवला तरी चालेल, पण शाळेच्या मैदानावर आठवडय़ातील चार दिवस देत क्रीडा गुण पदरात पाडून घ्या, असे आवाहन राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केले. राज्य शासनातर्फे दिला जाणाऱ्या २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षांच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे वितरण तावडे यांच्या हस्ते व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झाले.
‘‘मैदानांवरील खेळाडूंची संख्या कमी होत चालली आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही मुला-मुलींचा क्रीडांगणाकडे ओढा वाढावा, या दृष्टीने लवकरच प्रोत्साहनात्मक योजना आखणार आहोत. मैदाने व क्रीडा संकुले अवैध व्यवसायांची ठिकाणे होत आहेत, हे टाळण्यासाठी मैदानांवर अधिकाधिक खेळाडू दिसावेत यासाठी वार्षिक परीक्षेच्या गुणांमध्ये खेळाचे अतिरिक्त बोनस गुण देण्याची योजना आखणार आहोत,’’ असे तावडे यांनी सांगितले.
‘‘पुरस्कारांबाबत दरवर्षी खूप टीका केली जाते. हे लक्षात घेऊनच त्याबाबत काही गुणात्मक सुधारणा केली जाणार आहे. त्यासाठी क्रीडा पत्रकारांकडून सूचना मागविल्या जातील तसेच निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली जाईल. पुरस्काराबाबत अर्ज मागविण्याची तारीख, छाननीचा कालावधी, निवड जाहीर करण्याची तारीख व समारंभाची तारीख आदी तारखा यापुढे निश्चित केल्या जातील व त्याचे पालन केले जाईल,’’ असे आश्वासन तावडे यांनी दिले.
या समारंभात जलतरण संघटक रमेश विपट व कबड्डी संघटक गणपतराव माने यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासह एकंदर ८४ खेळाडू, प्रशिक्षक, संघटकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

vinod-tawde-2
२०१२-१३ या वर्षांचे पुरस्कार विजेते

शिष्टाचारास फाटा!
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते केले जावे, ते उपलब्ध नसतील तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे वितरण करावे असा शिष्टाचार आहे, मात्र गतवेळेप्रमाणे याही वर्षी त्याचे पालन केले गेले नाही. मंत्र्यांपेक्षा राज्यातील ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू किंवा जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले असते, तर अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया खेळाडूंनी व्यक्त केली.
पुरस्काराची नियमितता राखली जावी -बापट
शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांबाबत खेळाडू व त्यांच्या पालकांमध्ये खूप उत्सुकता असते. त्यामुळे दरवर्षी या पुरस्काराची नियमितता पाळली जावी, असा सल्ला बापट यांनी तावडे यांना दिला. ते पुढे म्हणाले, ‘‘खेळाडूंकरिता निधी कमी पडला जात असेल तर क्रीडा मंत्रालयाने त्यासाठी स्वयंस्रोत निर्माण करावेत. या क्रीडानगरीतील शुल्क सामान्य खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचे असते अशी तक्रार नेहमीच होत असते. खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये व त्यांना सवलतीच्या दरात येथील सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा खात्याने या क्रीडानगरीसाठी दरवर्षी दहा कोटी रुपयांची तरतूद केली पाहिजे,’’ असे बापट यांनी सांगितले.

तावडे उवाच!
* बालेवाडीतील इनडोअर स्टेडियममध्ये विवाह समारंभास बंदी.
* शासकीय नोकरीत खेळाडूंना क्रीडा खात्यामध्येच नोकरी, खेळाडूंनी मलईदार नोकरीचा आग्रह टाळावा.
* राज्याचा क्रीडा नकाशा तयार करून त्यानुसार प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणार.
* प्रशिक्षकांसाठी उद्बोधक शिबिरांचे आयोजन करणार.
* शिवछत्रपती पुरस्काराबाबत नियमितता राखणार.
* नोकरी करणाऱ्या खेळाडूंना कोणतेही कारकुनी काम देणार नाही.
* क्रीडा संकुलांमधील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी देखभाल व्यवस्थापकांची लवकरच नियुक्ती.
* क्रीडा पत्रकारांसाठीही शिवछत्रपती पुरस्कार दिला जाणार.
* राजकीय क्षेत्रापेक्षा क्रीडा क्षेत्रातच अधिक राजकारण.
२०१३-१४ या वर्षांचे पुरस्कार विजेते
२०१२-१३ या वर्षांचे पुरस्कार विजेते