इंग्लंडमध्ये रंगलेल्या महिला विश्वचषकात लक्षवेधी खेळी करुन सर्वांची मनं जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान भवनात सत्कार केला. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृती मंधाना, पुनम राऊत आणि मोना मेश्राम यांचा यावेळी गौरव करण्यात आला. राज्य सरकार तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपये बक्षिस देणार असल्याची घोषणा यावेळी फडणवीसांनी केली. यंदाच्या विश्वचषकात स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी भारतीय संघाची सलामीची धूरा सांभाळली होती. तर मोना मेश्राम हिने फलंदाज आणि गोलंदाज म्हणून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीबद्दल फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने विश्वचषकातील दैदिप्यमान कामगिरीने देशाची शान व मान उंचावली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे हे सभागृह मनपूर्वक अभिनंदन करत आहे. सर्व देशभरात भारतीय महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, संघाला जेतेपद मिळवता आले नसले तरी यांचा हा पराभव कोट्यवधी भारतीयांनी खांद्यावर घेतला. हा महिला संघाचा फार मोठा विजय आहे. समाजाच्या विविध स्तरावर आज महिला आपला ठसा उमटवत आहेत. विश्वचषकातील लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपये देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मितालीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. भारतीय महिलांच्या या कामगिरीमुळे त्यांनी भारतीयांची मनं जिंकली. क्रिकेटमध्ये पुरुषच नव्हे तर महिलाही दबदबा दाखवून देऊ शकतात, असा संदेश भारतीय संघाने दिला. त्यामुळेच अंतिम सामन्यातील निसटत्या पराभवानंतरी महिलासंघावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारतीय संघातील रेल्वेमध्ये कार्यरत असणाऱ्या खेळाडूंना बढती देणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. पश्चिम रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या हरमनप्रीत कौरलाही पंजाब सरकारने पोलिस दलात थेट पोलिस उप-अधिक्षक पदावर काम करण्याची संधी देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आता भारतीय संघाकडून प्रतिनीधत्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या मंधाना, राऊत आणि मेश्राम यांना राज्य सरकारने बक्षिस जाहीर केले.