आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता असलेले खेळाडू महाराष्ट्राने तयार करायचे आणि त्या खेळाडूंची अन्य संघांना निर्यात करायची हे चित्र अनेक खेळांमध्ये दिसून येते. बास्केटबॉल हा खेळही त्यास अपवाद नाही. कनिष्ठ विभागातील विविध गटांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवितात. मात्र त्यापैकी अनेक नैपुण्य शैक्षणिक कारकीर्दीवर अधिक लक्ष देण्यासाठी खेळाकडे पाठ फिरवितात. त्यामुळेच वरिष्ठ स्तरावर महाराष्ट्राचा संघ पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवू शकत नाही.
अतिशय वेगवान खेळ म्हणून लोकप्रिय असलेल्या बास्केटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे. मात्र जेव्हा शिक्षण व खेळ या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा विद्यार्थी व त्यांचे पालकही शिक्षणास झुकते माप देतात. खेळात कारकीर्द केल्यास मिळणाऱ्या पैशापेक्षाही शैक्षणिक पदवी हातात असली की खात्रीशीर उत्पन्न देणारा स्रोत उपलब्ध होतो हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही ठेवतात. त्यामुळे अव्वल दर्जाचे नैपुण्य खेळापासून वंचित राहते. महाराष्ट्रात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर बास्केटबॉलमध्ये असलेल्या खेळाडूंपैकी बरेचसे खेळाडू शैक्षणिक कारकीर्दीतही उच्च गुणवत्ता मिळविणारे विद्यार्थी असतात. त्यामुळेच कनिष्ठ गटाचा टप्पा ओलांडल्यानंतर ते मैदानाकडे पाठ फिरवितात व शिक्षणास प्राधान्य देतात. जे खेळाडू शिक्षणाऐवजी खेळास प्राधान्य देतात, ते खेळाडू वरिष्ठ गटात गेल्यानंतर त्यांना रेल्वे, सेनादल, पेट्रोलियम मंडळ, बँकांकडून खेळाडू म्हणून घेतले जाते व हे संघ वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत स्वत:चा संघ स्वतंत्ररीत्या उतरवीत असल्यामुळे बऱ्याच वेळा हेच खेळाडू महाराष्ट्राविरुद्धच खेळतात असे चित्र पाहावयास मिळते.
 अमेरिकेतील एनबीए लीग ही जगातील अत्यंत प्रतिष्ठेची बास्केटबॉल स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहत असतो. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये एनबीए लीगच्या संयोजकांनी विविध देशांतील नैपुण्य शोधाबरोबरच प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य हातात घेतले आहे. अगदी तेरा वर्षांपासूनच्या विविध गटांतील पाच-सहा मुले व मुलींची निवड करीत त्यांना अमेरिकेत अव्वल दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेल्या विपुल नैपुण्याच्या विकासाकरिता अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांची कमतरता आहे हे त्यांनी ओळखले व मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमधील प्रशिक्षकांकरिता उद्बोधक शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. त्याचा फायदा भारतामधील खेळाडूंना होऊ लागला आहे.
विविध खेळांच्या मदतीकरिता केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असतात. मात्र या योजनांचा फायदा घेण्यासाठी विविध कागदी घोडे नाचवायला लागतात. स्पर्धाचे आयोजन, क्रीडा सुविधा, पायाभूत सुविधा आदींकरिता शासनाच्या भरपूर योजना आहेत. मात्र त्याकरिता शासन आपणहून काही देत नसते. संघटकांनी स्वत:च त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. दुर्दैवाने आजपर्यंत बास्केटबॉल संघटकांकडून अपेक्षेइतके प्रयत्न झाले नसावेत. जर समजा काही प्रयत्न झाले असतील त्याचा योग्य रीतीने पाठपुरावा झाला नसावा. राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या उदयोन्मुख कुमार खेळाडूंना शासकीय नोकरीची हमी मिळाली तर ते निश्चितच अन्य संघांकडे जाणार नाहीत. शासकीय नोकरीत पाच टक्के जागा खेळाडूंसाठी राखीव असतात. अर्थात या पाच टक्के जागांकरिता खूपच चढाओढ असते. त्यामुळेच खेळाडूंना अर्थार्जनाची हमी मिळाली तर निश्चितच अन्य संघांऐवजी महाराष्ट्राकडेच राहतील. अर्थात खेळाडूंना अशी हमी अन्य कापरेरेट्सकडून मिळविण्यासाठी संघटना स्तरावरही प्रयत्न होण्याची गरज आहे.