राजस्थान येथे २४ ते २८ मार्चदरम्यान झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत विजेतेपदावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या कामगिरीचा आणि एकंदर खेळाच्या वस्तुस्थितीचा प्रशिक्षक बिपिन पाटील यांनी घेतलेला आढावा..

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील दुहेरी विजेतेपद, हे महाराष्ट्रात खो-खो खेळाला किती चांगले दिवस आले आहेत, याचे योग्य उदाहरण आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा महाराष्ट्राला विजेतेपद मिळाले, हीच बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्य खो-खो संघटनेचे सरचिटणीस संदीप तावडे यांनी सलग तीन वर्षे विजेतेपदाने हुलकावणी दिलेल्या महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती व ती मी यशस्वीपणे निभावल्यामुळे माझ्या आनंदाचे मी नेमक्या शब्दांत वर्णन करू शकत नाही. युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घातल्यानेच जेतेपद पटकावता आले.

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
Eknath khadase and sharad pawar
“शरद पवारांचा मी ऋणी, संकटाच्या काळात मला…”, भाजपात परतणाऱ्या एकनाथ खडसेंचं विधान चर्चेत
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

राज्याच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंची मोट बांधून विजेतेपद मिळवणे सोपे नव्हते. मात्र सांगली येथे झालेल्या स्पर्धापूर्व शिबिराचा खेळाडूंना आणि प्रशिक्षक म्हणून मलाही फायदा झाला. गेली तीन वर्षे महाराष्ट्र कुठे तरी कमी पडत होता. यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या संघाचे अधिक गडी बाद व्हायचे. प्रत्येक डावात आपले आठ किंवा कधी कधी नऊ खेळाडूसुद्धा बाद व्हायचे. मात्र यंदा सहा-सात खेळाडूच संपूर्ण नऊ मिनिटे कशा प्रकारे खेळून काढतील, यावर भर दिला. त्याशिवाय आक्रमण करताना प्रतिस्पर्धी संघातील कितीही अव्वल दर्जाचा खेळाडू असला तरी सलग दीड ते दोन मिनिटे त्याच्याच मागे जोर लावून धावण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या खेळाडूंना देण्यात आला. यादरम्यान आपला खेळाडू थकणार नाही, म्हणून लगेच ‘खो’ देण्याचे तंत्रही खेळाडूंना शिकवण्यात आले. सुरुवातीच्या मिनिटांत उडी मारून बाद करण्याच्या प्रयत्नात वेळ वाया न घालवता अखेरच्या क्षणांसाठी कशा प्रकारे तंदुरुस्ती राखून ठेवण्यात येईल, याकडे लक्ष दिले. खेळाडूंवर अतिरिक्त ताण येणार नाही किंवा त्यांची बलस्थाने व कमकुवत बाजूंचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मुळात महाराष्ट्राची खो-खोमध्ये मक्तेदारी असल्यामुळे समोरचा संघ मैदानावर उतरण्यापूर्वीच ५० टक्के खचलेला असतो. त्यामुळेच मानसिकदृष्टय़ा खेळाडूंचे मनोबल उंचावले व त्यांना विजेतेपदाच्या ध्येयानेच कामगिरी करण्यास प्रवृत्त केले.

गेल्या १० वर्षांत खो-खो या खेळात मोठय़ा प्रमाणावर बदल झाला आहे. सध्याचा खो-खो हा वेगावर अधिक लक्ष केंद्रित करणारा आहे. त्यामुळे खेळाडूचे कौशल्य कुठे तरी झाकोळले जात आहे. पहिल्यापेक्षा आता ‘फाऊल्स’ कमी होत आहेत. त्याशिवाय वेळेशी स्पर्धा असल्याने कोण किती चपळाईने आपल्या संघासाठी गुण मिळवतो, हे महत्त्वाचे झाले आहे; परंतु खुंट मारण्याची पद्धत व त्यासाठी करावा लागणारा संघर्ष यातील जादू आजही कायम आहे. रेल्वेच्या संघाने महाराष्ट्राला नेहमीच कडवी झुंज दिली आहे. तसेच दक्षिणेकडील केरळच्या संघानेसुद्धा या वेळी महाराष्ट्राला विजयासाठी संघर्ष करावयास लावला. भविष्यात महाराष्ट्राला विजेतेपद टिकवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहेत, हेच या स्पध्रेतून निदर्शनास येत आहे.

खेळाडूंना आता व्यावसायिक संधी उपलब्ध होत असल्या तरी काही खेळाडूंना आर्थिकदृष्टय़ा अद्यापही अपेक्षेप्रमाणे मानधन मिळत नाही. भविष्यात सीमा सुरक्षा दलातदेखील (बीएसएफ) खो-खोपटूंना नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार असून, शालेय-महाविद्यालयीन पातळीवर काही खेळाडू शिष्यवृत्तीद्वारे स्वत:च्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत आहेत. पुरस्कारांच्या रकमेत झालेली वाढ खेळासाठी अनुकूल आहे, त्याशिवाय रोख पुरस्कार फक्त जाहीर न करता प्रत्यक्षात खेळाडूंपर्यंत ते पोहोचवण्यात आल्यामुळे खेळाडूही संघाच्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत हातावर मोजण्याइतक्या शाळांमध्ये नक्कीच खो-खोचे धडे उत्तम प्रकारे शिकवले जातात. जे खेळाडू शालेय स्तरावरून उदयास आलेले आहेत, त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही शाळेत खो-खोचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, तर ते सर्वासाठीच लाभदायक ठरेल. महाराष्ट्रात असंख्य गुणी प्रशिक्षक आहेत, मात्र प्रत्येकालाच वेळेचे गणित सांभाळून शाळेसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेक जण क्लबमध्ये प्रशिक्षण देण्याला प्राधान्य देतात. शालेय वयातच एखाद्या खेळाडूवर ही प्रक्रिया सुरू झाली तर तो कधीच या खेळापासून लांब राहू शकत नाही, हे मी हमखासपणे सांगू शकतो. प्रो खो-खो लीग किंवा अन्य जिल्हास्तरीय स्पर्धाचे ठरावीक अंतराने आयोजन केल्यास महाराष्ट्रात खो-खोचे वारे कायम वेगाने वाहत राहतील, याची मला खात्री आहे.

(शब्दांकन : ऋषिकेश बामणे)