राहुल त्रिपाठी व चिराग खुराणा यांनी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ५ बाद २४४ धावांपर्यंत पोहोचता आले. त्याआधी राजस्थानने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या.
राजस्थान संघाने ५ बाद २५८ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी ते किमान ३५० धावांचा पल्ला गाठतील अशी अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे त्यांना ते आव्हान गाठता आले नाही. जेमतेम ३१८ धावांपर्यंत त्यांनी मजल गाठली. महाराष्ट्राकडून समद फल्ला व श्रीकांत मुंडे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

हर्षद खडीवाले (२६) व कर्णधार रोहित मोटवानी (३४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. केदार जाधव याने दमदार ४५ धावा करूनही महाराष्ट्राचा निम्मा संघ १३१ धावांत तंबूत परतला. महाराष्ट्राची ही घसरगुंडी त्रिपाठी व खुराणा यांनी थोपवली. त्यांनी राजस्थानच्या संमिश्र माऱ्यास तोंड देत सहाव्या विकेटसाठी ३० षटकांत ११३ धावांची नाबाद भागीदारी केली. खुराणाने ९९ चेंडूंत नाबाद ६४ धावा केल्या. त्रिपाठीने नाबाद ४७ धावा करीत त्याला चांगली साथ दिली. त्याने दोन चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली.

सामन्याचे उर्वरित दोन दिवस बाकी असल्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळविण्याची चांगली संधी आहे. त्याकरिता त्यांना आणखी ७५ धावांची भर घालण्याची आवश्यकता आहे.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव) : १०२.१ षटकांत सर्वबाद ३१८ (अशोक मणेरिया ८४, रजत भाटिया ५९, डी. एल. चहार नाबाद ४१; समद फल्ला ३/७७, श्रीकांत मुंडे ३/९४).
महाराष्ट्र (पहिला डाव) : ७१ षटकांत ५ बाद २४४ (चिराग खुराणा खेळत आहे ६४, राहुल त्रिपाठी खेळत आहे ४७, केदार जाधव ४५, रोहित मोटवानी ३४; ए.बी.सिंग २/४०).