अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या महिला विभागात यंदाही अंतिम फेरीत महाराष्ट्राची परंपरागत प्रतिस्पर्धी रेल्वेशीच गाठ पडली. पण यंदा महाराष्ट्राच्या मुलींनी अखेपर्यंत शर्थीने झुंज दिली. शेवटी फक्त एका गुणाने महाराष्ट्राच्या पदरी उपविजेतेपद पडले. या निसटत्या पराभवाचे शल्य एकीकडे महाराष्ट्राची कर्णधार स्नेहल साळुंकेला जसे बोचत होते, तसेच मैदानावर सांघिकपणे ‘एकीचे बळ’ दाखवत रेल्वेला दिलेली टक्कर समाधान देणारी असल्याचे मतही तिने प्रकट केले. ‘पुढील वर्षी आम्ही महाराष्ट्राला नक्की अजिंक्यपद मिळवून देऊ,’ असा विश्वास आंतरराष्ट्रीय कबड्डीचा अनुभव गाठीशी असणाऱ्या स्नेहलने प्रकट केला.
‘‘तीन मिनिटे बाकी असताना आमच्याकडून चूक झाली आणि तेजस्विनी बाईने बोनससोबत आणखी एक गुण रेल्वेला मिळवून दिला. याचप्रमाणे आमची भरवशाची चढाईपटू दीपिका जोसेफची अखेरच्या मिनिटाला पकड झाली. हे दोन क्षण आमच्यासाठी निर्णायक ठरले,’’ असे स्नेहलने सांगितले.
तेजस्विनी बाई आणि ममता पुजारी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडू रेल्वेच्या संघात होत्या. त्यांच्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या व्यूहरचनेबाबत स्नेहल म्हणाली, ‘‘तेजस्विनीव्यतिरिक्त एकाही खेळाडूला आमच्या क्षेत्ररक्षणाचे आव्हान पेलवले नाही. ममताची पहिल्याच चढाईत सुवर्णा बारटक्केने पकड केली. त्यानंतर आणखी तीनदा तिची मी पकड केली. महाराष्ट्राने ममताला पूर्णत: निष्प्रभ करीत चारदा पकड केली. त्यासाठी आम्ही सरावातच विशेष व्यूहरचना आखली होती.’’
स्नेहल साळुंके पुढे म्हणाली, ‘‘पहिल्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध फक्त एका गुणाने आम्हाला विजय मिळवता आला. पण स्पध्रेतील सर्व सामन्यांत महाराष्ट्राच्या संघाची सांघिक ताकद दिसून आली. दरवर्षी महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते. यावर्षी काहीतरी चमत्कार घडवून दाखवायचा आणि जेतेपद महाराष्ट्राला जिंकून द्यावे. ही जिद्द संपूर्ण संघात भिनली होती. महाराष्ट्राच्या प्रशिक्षिका सिमरन गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळत होते. आमचा खेळही अपेक्षेप्रमाणेच उंचावला. पण दुर्दैवाने फक्त एका गुणाने उपविजेतेपद वाटय़ाला आले. त्याचे शल्य बोचत आहे.’’
महाराष्ट्र-रेल्वे यांच्यातच राष्ट्रीय कबड्डीमधील अंतिम लढत गेली अनेक वष्रे होते. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संघातील चमकणाऱ्या खेळाडूंना रेल्वेचे ‘रेड कार्पेट’ असायचे. पण आता चित्र पालटले आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना स्नेहल म्हणाली की, ‘‘निश्चितच. यंदाच्या रेल्वेच्या संघात फक्त किशोरी शिंदे हा एकमेव महाराष्ट्राचा चेहरा होता. पण रेल्वेने तिला संधीच दिली नाही. रेल्वेचे मध्यरक्षण नीट होत नव्हते. किशोरी तिच्यापेक्षा नक्कीच सरस होती. नोकरीसाठी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जर पुरेशी संधी मिळणार नसेल, तर खेळाडूंनीही विचार करायला हवा. आता महाराष्ट्र शासनाने कबड्डीपटूंसाठी दर्जेदार नोकऱ्या आणि कोटी रकमेची बक्षिसाची परंपरा सुरू केली आहे आणि महाराष्ट्राच्या या खेळाला राजाश्रय मिळाला आहे. त्यामुळे रेल्वेकडे नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण खुंटले आहे आणि याचमुळे महाराष्ट्राचा संघ अधिक बळकट होतो आहे.’’