महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा ही राज्यातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. एकवेळ ऑलिम्पिकला जाता आले नाही तरी चालेल, पण हा किताब ‘काहीही करून जिंकायचाच’ याच ईर्षेने राज्यातील मल्ल सराव करतात. दुर्दैवाने हे किताब मिळविणारे किंवा त्यासाठी धडपडणारे मल्ल म्हणजे त्यांच्या वस्तादाच्या हातातील बाहुलेच झालेले असतात. मल्लाने कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचा व कोणत्या स्पर्धेत उतरायचे नाही, हे सर्व या वस्तादांच्याच हातात असते. त्यामुळेच दिवसेंदिवस महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा कारखाना झाला आहे.

पंजाब, हरयाणा, दिल्लीकडील पहिलवान जन्माला येतो तो आंतरराष्ट्रीय त्यातही ऑलिम्पिक क्रीडा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत किमान प्रतिनिधित्व करण्यासाठीच असे म्हटले जाते. या उलट महाराष्ट्रातील मल्ल हा फक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरताच विचार करतो असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. त्यातही एखाद्या मल्लाने ऑलिम्पिकसाठी प्रयत्न केला तर उत्तरेकडील संघटकांच्या मक्तेदारीपुढे त्याची डाळ शिजत नाही. खरे तर भारतीय कुस्तीगीर महासंघावर महाराष्ट्राच्या कुस्तीचे सर्वेसर्वा असलेले बाळासाहेब लांडगे यांचा बोलबाला आहे. परंतु महाराष्ट्राच्या मल्लाला भारतीय संघात स्थान देण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षेइतके प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळेच की काय रामचंद्र सारंग, काका पवार, राहुल आवारे यांच्यासह अनेक मल्लांना ऑलिम्पिकचे स्वप्न साकार करता आलेले नाही.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू असतानाच बाळासाहेब लांडगे यांची पुणे राष्ट्रीय तालीम संघाने हकालपट्टी केली. संघाची बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई झाली. त्यामुळे राज्य संघटनेतील त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. अर्थात काही संघटकांना आपल्याविरुद्ध कोणी कितीही षड्यंत्र रचले तरी आपले स्थान अढळ आहे, याची कल्पना असते, तशीच काहीशी परिस्थिती राज्य कुस्ती संघटनेत आहे. काही व्यक्तींविरुद्ध कितीही टीका झाली तरी शेवटी सर्वजण त्यांच्याच मागे असतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत एकही ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल घडवता आला नाही, याची जाणीव ठेवत स्वत:हून खुर्चीवरून पायउतार होऊन युवा संघटकांकडे ही जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धापेक्षा शान महत्त्वाची

महाराष्ट्र केसरी किताब मिळवणाऱ्या मल्लांना राष्ट्रीय स्पर्धेची खूप भीती वाटत असते. जर आपण या स्पर्धेत पहिल्या दुसऱ्या फेरीतच पराभूत झालो तर आपण मिळवलेल्या महाराष्ट्र केसरी पदाद्वारे जिंकलेल्या मानाला तडा जाईल, आपल्याला विविध समारंभामध्ये फेटा बांधून मिरवता येणार नाही, आपल्याला सत्कारांपासून वंचित रहावे लागले अशी सदोदित भीती या मल्लांना वाटत असते. त्यामुळे हा किताब मिळवणारे बहुतांश मल्ल राष्ट्रीय स्पर्धेकडे पाठ फिरवतात.

तालमींच्या डागडुजीपेक्षा चैनीला प्राधान्य

  • भूगांव येथे महाराष्ट्र केसरी गटात उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या एक-दोन मल्लांना त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंपेक्षा जास्त पारितोषिकाची कमाई झाली. जे मल्ल आलिशान मोटारींमधून हिंडतात, त्यांच्यावर पैशांची उधळपट्टी करण्याची खरोखरीच गरज असते का? राज्यात अनेक तालमींची दैनावस्था आहे.
  • शासनाकडून अनेक तालमींकरिता निधी मिळत असला तरी त्याचा योग्य रीतीने विनियोग होत नाही असाच अनुभव आहे. पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रही त्याला अपवाद नाही. या केंद्रात खेळाडूंसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या खिडक्यांना काचाच नाहीत.
  • अनेक तालमींमध्ये मल्ल कोंदट जागेत राहतात. २०-२५ मल्लांकरिता केवळ एकच न्हाणीघर व शौचालय असेल तर त्याची काय अवस्था होत असेल याचा विचार करणेदेखील अवघड आहे. अनेक नामवंत प्रशिक्षकांद्वारे चालवलेल्या तालमींमध्ये असे विदारक चित्र दिसून येत असते.

राहुल आवारेकडे ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याची योग्यता आहे. खरे तर २०१६मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला ही संधी मिळाली असती. तथापि त्यासाठी आवश्यकता असलेल्या पात्रता स्पर्धेत तो सहभागी झाला नाही. काही वेळा आपल्या प्रशिक्षकांपेक्षा स्वत: ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असते. सहसा कमी वजनी गटामध्ये भारतीय खेळाडूंना खूप चांगली संधी असते. राहुल हा अशा गटांमध्ये खेळत असल्यामुळे त्याला फारशी कठीण स्पर्धा नसेल. अजूनही त्याची संधी हुकलेली नाही. त्याने भरपूर मेहनत करावी.  – योगेश्वर दत्त, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता

आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील अनुभव केवळ राष्ट्रीय स्पर्धामध्ये महत्त्वाचा असतो असे नव्हे तर महाराष्ट्र केसरी किताबासाठीही हा अनुभव फायदेशीर असतो. नरसिंग यादवने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. अभिजीत कटकेनेही राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतल्यामुळे तेथील अनुभव त्याला यंदा हा किताब मिळविण्यासाठी झाला आहे. महाराष्ट्राच्या मल्लांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवण्याचा प्रयत्न करावा.  -प्रा.दिनेश गुंड, आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक

मल्लांपेक्षा संघटकांचे परदेश दौरे अधिक

  • हेलसिंकी येथे खाशाबा जाधव या महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवले. त्यानंतर एकही महाराष्ट्रीय खेळाडू त्या कामगिरीपर्यंत पोहोचलेला नाही. दुर्दैवाने अन्य राज्यांइतके पाठबळ महाराष्ट्राच्या मल्लांना संघटनात्मक स्तरावर मिळत नाही.
  • भारतीय कुस्तीगीर महासंघ, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना या तीनही संघटनांवर अनेक वर्षे हुकमत असलेल्या पुण्यातील संघटकाला फक्त स्वत:च्या परदेशवाऱ्या जास्त महत्त्वाच्या वाटतात. महाराष्ट्राचे जेवढे मल्ल ऑलिम्पिकला गेले आहेत, त्यापेक्षा जास्त वेळा त्यांच्या ऑलिम्पिकला संघटक म्हणून वाऱ्या झाल्या आहेत.
  • चीन, अमेरिका आदी देशांचे संघटक आपल्या पथकात संभाव्य ऑलिम्पिकपटूला घेऊन जातात व त्याला ऑलिम्पिकचे वातावरण कसे आहे, याचे ज्ञान देतात. आपल्याकडे फक्त स्वत:ची खुर्ची व सत्ता एवढेच या संघटकांना माहीत असते.

महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याची क्षमता आहे. मात्र संकुचित वृत्तीमुळे ते ऑलिम्पिकसाठी तयारी करत नाहीत. महाराष्ट्राच्या मल्लांना केव्हाही मार्गदर्शन करण्यास मी तयार आहे. त्यांना दिल्लीत किंवा हरयाणात येणे शक्य नसले तरी मी महाराष्ट्रात येऊन त्यांना प्रशिक्षण देईन. -कर्तार सिंग, आंतरराष्ट्रीय मल्ल व प्रशिक्षक