महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या संयोजनामधील भपकेबाजपणा, नेत्यांची ढवळाढवळ, प्रशिक्षकांचा बेशिस्तपणा, पंचांची सदोष कामगिरी, संयोजकांच्या चुका यांमुळे या स्पर्धेस उरुसाचे स्वरूप आले आहे.

भूगांव येथे नुकतीच ६१ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे पुण्याचा मल्ल अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरी किताब मिळविला. गतवर्षी त्याला या किताबाच्या लढतीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याला हरवीत विजय चौधरी याने गतवर्षी किताबाची हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. त्या वेळी हुकलेला किताब यंदा अभिजीत घेणारच असा दावा केला जात होता. या मुख्य किताबाबरोबरच अन्य विविध गटांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.

कुस्तीच्या आखाडय़ाचे राजकीय आखाडय़ाशी अतूट नाते असते. त्यामुळेच आजपर्यंत बहुतांश स्पर्धामध्ये राजकीय भवितव्य लक्षात घेऊन तेथील स्थानिक पुढारी ही स्पर्धा भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा प्रयत्न करीत असतात. राजकीय नेत्यांच्या सोयीनुसार या स्पर्धाच्या तारखा निश्चित केल्या जातात. मुख्य किताबाची कुस्तीही प्रमुख पाहुणे आल्याखेरीज सुरू केली जात नाही. भूगांवची स्पर्धाही त्यास अपवाद नव्हती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेस नेहमीच प्रचंड प्रेक्षक येत असतात. हे लक्षात घेऊन संयोजकांनी ४० हजारपेक्षा जास्त प्रेक्षक बसू शकतील एवढी मोठी गॅलरी उभी केली होती. वेगवेगळ्या ज्येष्ठ मल्लांच्या नावाचे फलक ठळकपणे लावून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न संयोजकांनी केला. केसरी किताब कुस्तीच्या वेळी जवळपास पाऊण लाख प्रेक्षक उपस्थित होते. मुख्य स्टेडियमवर ज्यांची बसण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यांच्याकरिता स्टेडियमबाहेर मोठय़ा पडद्यावर लढत पाहण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. तथापि या पडद्यावर विविध पाहुण्यांचेच सत्कार बराच वेळ दाखविले जात असल्याची अनेक प्रेक्षकांची तक्रार होती.

सरडय़ाची धाव कुंपणापर्यंतच असते असे आपण नेहमी उपहासाने म्हणत असतो. महाराष्ट्रातील अनेक मल्लांची स्थिती यासारखीच असते. विशेषत: महाराष्ट्र केसरी व ९२ किलोवरील गटात सहभागी होणारे मल्ल केवळ स्थानिक स्तरावर वर्चस्व गाजविण्यासाठी उत्सुक असतात. महाराष्ट्र केसरी किताब मिळविण्यापलीकडे आपल्या राज्यांमधील बहुतांश मल्लांची मजल जात नाही. ते फार फार तर हिंदू केसरी स्पर्धेत सहभागी होतात. ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेले महाराष्ट्राबाहेरील मल्ल सहसा हिंदू केसरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक नसतात. पंजाब, हरयाणा व दिल्लीकडील मल्लांपुढे महाराष्ट्राच्या मल्लांचा राष्ट्रीय स्पर्धेत निभाव लागत नाही. आपण राष्ट्रीय स्पर्धेत पराभूत झालो तर आपण मिळविलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असेच त्यांना वाटत असते. तसेच असा पराभव स्वीकारला तर विविध ठिकाणी होणाऱ्या सन्मानांपासून वंचित राहू की काय अशी भीती त्यांना वाटत असते. नरसिंग यादव याने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळविला. त्याने जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये चांगले यश मिळविले. दुर्दैवाने राष्ट्रीय स्तरावरील अंतर्गत गटबाजीच्या तडाख्यामुळे तो उत्तेजकाच्या विळख्यात भरडला गेला व त्याला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. महाराष्ट्र केसरी किताब मिळविणाऱ्या मल्लांनी आपण किती आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला किंवा किती आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले याबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रशिक्षक व चाहत्यांकडून गोंधळ होणे ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. भूगांव येथेही अनेक वेळा त्याचा प्रत्यय आला. अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनाच पाचारण करावे लागले. पंचांच्या सदोष कामगिरीचा फटका काही गुणवान खेळाडूंना बसतो. त्यासाठी निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची सुविधा असते. धोकादायक चाल केली तर ज्याने ही चाल केली त्याच्याविरुद्ध गुण दिले जातात. हा नियम लावायचा झाल्यास कटके व भगत यांच्यातील लढतीत पहिल्याच मिनिटाला हा नियम लावण्याची गरज होती. लढत सुरू झाली नाही तोच अभिजीतने भगतचे हात चुकीच्या पद्धतीने दाबले. त्यामुळे भगतला वैद्यकीय उपचारही घ्यावे लागले. मात्र या वेळी पंचांनी भगतला कोणताही तांत्रिक गुण दिला नाही. असे प्रकार अन्य लढतींमध्येही दिसून आले. पंचांच्या कामगिरीत कशी सुधारणा होईल याकडे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

काही वेळा काही माणसांना असे वाटते की आपल्या हातात माइक आला की आपण वक्तृत्वपटूच आहोत. येथेही असाच अनुभव पाहावयास मिळाला. मातीची दोन मैदाने व गादीचे दोन आखाडे अशा चार ठिकाणी लढती आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रत्येक मैदानाच्या ठिकाणी मल्लांना पुकारण्यासाठी माइकची सुविधा देण्यात आली होती. त्या खेरीज कुस्त्यांचे समालोचन करण्यासाठी एका हिंदूी व एका मराठी निवेदकाची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मुख्य व्यासपीठावरही निवेदन करण्यासाठी माइकची सुविधा होती अशा चारपाच जणांकडे माईक होते. मात्र त्यांच्यात कधीही सुसूत्रता नव्हती. त्यामुळे एकाच वेळी दोन-तीन जणांचे आवाज मोठय़ाने ऐकू येत होते. एक-दोन मल्लांना या माइकच्या गोंधळामुळे आपले नाव पुकारले गेलेले कळलेच नाही. मुंबईच्या एक-दोन मल्लांना त्याचा मोठा फटका बसला.

कुस्तीच्या कोणत्याही स्पर्धा असल्या की मोठे व्यासपीठ उभारले जाते कारण बहुतेक पैलवान मंडळी व्यासपीठावर बसण्यासाठी आटापिटा करीत असतात. येथेही शंभरहून अधिक मंडळी बसतील एवढा मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. मात्र स्पर्धाचे वार्ताकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांकरिता आच्छादन विरहितच व्यवस्था करण्यात आली होती. दिवसा कडक उन्हाचा तर रात्री कडक थंडीचा त्रास प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रतिनिधींना झाला. या कक्षातही पत्रकारांसाठी ठेवलेल्या आसनांवर तेथील स्थानिक स्वयंसेवकांचीच कब्जा करण्याचा व त्यामुळे वादंग निर्माण होण्याचे प्रकारही घडले. खरंतर महाराष्ट्राच्या कुस्तीस मोठे करण्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे. तथापि अन्य स्पर्धाप्रमाणेच यंदाच्याही महाराष्ट्र केसरी स्पर्धेस प्रसारमाध्यमांना दुर्लक्षितच करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धाही उत्तेजकविरहित व्हावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. गतवर्षी संयोजकांनी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे (नाडा) चाचणी घेण्याची सुविधा देण्याबाबत अर्ज पाठविला होता. मात्र अपुऱ्या साधनसामग्रीमुळे ही चाचणी होऊ शकली नव्हती. यंदाही त्यांनी उत्तेजक चाचणीसाठी नाडा संस्थेकडे अर्ज पाठविला होता (निदान तसे संयोजकांकडून सांगण्यात आले) तथापि उत्तेजक चाचणीची कोणतीही सुविधा आढळून आली नाही.

कुस्ती पाहण्यासाठी ४० ते ५० हजार प्रेक्षक दररोज येत होते. मात्र त्यांच्यासाठी करण्यात आलेली स्वच्छतागृहांची व्यवस्था अपुरीच होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उभारण्यात आलेल्या मुख्य व्यासपीठाजवळ केवळ दोनच स्वच्छतागृहे होती. तेथेही पाण्याची नीट व्यवस्था नसल्यामुळे त्याचीही दैन्यावस्थाच दिसून आली. अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे लोक मांडवाच्या पाठीमागच्या जागेचा उपयोग करीत होते. साहजिकच सायंकाळी वाऱ्याच्या झुळुकेबरोबर लोकांना दरुगधीचा वासही सहन करावा लागला. मुख्य व्यासपीठावर आलेल्या अनेक पाहुण्यांकरिता फेटे व हारतुऱ्यांवर संयोजकांनी भरपूर खर्च केला. त्या ऐवजी त्यांनी हा खर्च स्वच्छतागृहांसाठी केला असता तर अधिक उचित ठरले असते. त्याचप्रमाणे अनेक मल्लांवर त्यांच्या चाहत्यांनी पैशांची व अन्य पारितोषिकांची उधळण केली. बोलेरो, सफारी आदी महागडय़ा गाडय़ांमधून हिंडणाऱ्या व गाडीमागे महापौर केसरी किंवा अन्य किताबाचे नाव लिहिणाऱ्या मल्लांवर खरोखरीच बुलेट, रॉयल एनफिल्ड अशा महागडय़ा बक्षिसांची खैरात करण्याची आवश्यकता आहे काय? चाहत्यांना कुस्तीविषयी खूप प्रेम असेल तर त्यांनी गरजू मल्लांना रोज सकस आहार देण्यासाठी, स्पर्धात्मक अनुभव मिळवून देण्यासाठी खर्च केला पाहिजे. दुर्दैवाने प्रत्येक महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हेच आढळून येत असते. संयोजकांनी याबाबत आत्मपरीक्षण केले तरच महाराष्ट्राचा एखादा मल्ल ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न साकार करू शकेल. अर्थात ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मल्लांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तरी खूप मोठे यश मिळविल्यासारखे होईल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य- लोकप्रभा