तांत्रिक गुणासह चीतपटमुळे गोंदियाचा सचिन मोहोळ पराभूत

जालना येथे सुरू असलेल्या ६२व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पध्रेच्या तिसऱ्या दिवशी महत्त्वाच्या गटाच्या पहिल्या लढतीत गणेश जगताप (हिंगोली) हा तांत्रिक गुण आणि चितपटने विजयी झाला असून त्याने गोंदियाच्या सचिन मोहोळला पराभूत केले.

सकाळचे सत्र गादी व माती विभागातील ६१, ७० व ८६  किलो वजनी गटातील उपांत्य फेरी आणि ७४ आणि ९७ वजनगटांसह ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटांच्या वजनांमधील मल्लांची स्पर्धा पार पडली. ६१ किलो माती विभागात उपांत्य फेरीमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सूळ याचा ७-० अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली. तत्पूर्वी, निखिलने उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली होती. दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. यात राहुल पाटीलने दत्ता मेटेचा १२-११ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या (कांस्यपदक) लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर ५-४ अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.

६१ किलो वजनी गटात गादी विभागाच्या उपांत्य फेरीमध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा १०-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर ४-२ अशी मात करून अंतिम फेरी गाठली आहे.

तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा ८-२ अशा गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकाविले, तर कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर १०-० अशी मात करत कांस्यपदक जिंकले.

७० किलो गादी विभागातल्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या स्वप्निल पाटीलने पुणे जिल्ह्य़ाच्या दिनेश मोकाशीला ४-३ ने हरवत अंतिम फेरीत धडक मारली. पुण्याच्या शुभम थोरातने सोलापूरच्या धीरज वाघमोडेला ८-२ अशा गुणाधिक्क्याने पराभूत करून अंतिम फेरी गाठली. या गटातील कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्य़ाच्या दिनेश मोकाशीने लातूरच्या आकाश देशमुखचा ७-२ अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकावले, तर सोलापूरच्या धीरज वाघमोडेनेही साताऱ्याच्या आकाश मानेवर ८-५ अशी मात करून कांस्यपदक जिंकले.

७० किलो गादी विभागाच्या उपांत्य फेरीमध्ये पुणे जिल्ह्य़ाच्या अनिकेत खोपडेने लातूरच्या चंद्रशेखर पाटीलवर २-० अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अहमदनगरच्या अक्षय कावरेने कोल्हापूरच्या इंद्रजित मगदुमचा १२-१ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर माती विभागातून अरुण खेगळे हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

शुक्रवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाची कार्यक्रम पत्रिकाही निश्चित करण्यात आली असून, गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि मागल्या वर्षी दुखापतीमुळे पहिल्याच फेरीतून बाहेर पडलेला शिवराज राक्षे यांच्यात लढत होणार असून विक्रम वडतिले विरुद्ध विष्णू खोसे, गुलाबराव आगरकर विरुद्ध महेश वरुटे, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील अशा काही रंगतदार कुस्त्या संध्याकाळच्या सत्रात पार पडल्या.