News Flash

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : चंद्रहार पाटीलचे आव्हान संपुष्टात

सांगलीच्या चंद्रहार पाटील याचे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळविण्याचे स्वप्न येथे पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. भोसरी येथे सुरू असलेल्या राज्य कुस्ती

| December 3, 2013 02:39 am

सांगलीच्या चंद्रहार पाटील याचे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळविण्याचे स्वप्न येथे पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. भोसरी येथे सुरू असलेल्या राज्य कुस्ती स्पर्धेतील गादी विभागात पुण्याच्या सचिन येलभर याने त्याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. अन्य गटात महादेव कुसुमडे (सोलापूर जिल्हा), उत्कर्ष काळे (पुणे जिल्हा) व शरद पवार (लातूर) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
 या स्पर्धेत चंद्रहार व सचिन यांच्यातील कुस्तीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत चंद्रहार याने सचिनला फ्रंट साल्तो डाव टाकण्याचा प्रयत्न केला. सचिन हा मैदानाबाहेर गेल्यामुळे चंद्रहार याला एक गुण मिळाला. दुसऱ्या फेरीत चंद्रहार याने सचिनला हप्ता डाव टाकण्याचा प्रयत्न केला. सचिनने त्यामधून चपळाईने सुटका करीत चंद्रहारवर डाव उलटविला. त्यामध्ये त्याला दोन गुण मिळाले. याच दोन गुणांच्या आधारे सचिनने ही कुस्ती २-१ अशा फरकाने जिंकली. सचिन याला या विजयाचा फायदा घेता आला नाही. सायंकाळच्या सत्रात सोलापूरच्या महादेव सरगर याने त्याचे आव्हान संपुष्टात आणले. ही लढत महादेवने गुणांवर जिंकली.
 दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचा दावेदार असलेल्या समाधान घोडके याने माती विभागातील लढतीत पुण्याच्या सचिन मोहोळ याला पहिल्याच तीन मिनिटांमध्येच ६-० असे पराभूत केले.
सोलापूरच्या महादेव कुसुमडे याने गादी विभागातील ६६ किलो गटात सुवर्णपदक मिळविताना पिंपरीच्या संदेश काकडे याच्यावर मात केली. त्याचे हे चौथे सुवर्णपदक आहे. अमित शेळके (अहमदनगर) व संजय पाटील (मुंबई शहर) यांनी कांस्यपदक मिळविले. ५५ किलो गटाच्या गादीवरील अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाच्या उत्कर्ष काळे याने आबा आटकले (सोलापूर जिल्हा) याच्यावर विजय मिळविला. राहुल शिंदे (बीड) व प्रकाश कोळेकर (सांगली) हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. माती विभागात शरद पवार याने अजिंक्यपद मिळविताना भरत पाटील (कोल्हापूर शहर) याचा पराभव केला. विनोद राक्षे (सांगली) याला कांस्यपदक मिळाले.
ऑलिम्पिकपटू नरसिंगचा मोठा विजय
महाराष्ट्र केसरी किताब दोन वेळा जिंकणाऱ्या नरसिंग यादव या ऑलिम्पिकपटूने झकास विजयी सलामी केली. मुंबई शहर संघाच्या या खेळाडूने सोलापूरच्या गोपीनाथ घोडके याचा सात गुणांनी पराभव केला. ही लढत जिंकताना त्याने कुस्तीचे अप्रतिम कौशल्य दाखवित  चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गादी विभागातच महाराष्ट्र केसरी पदाचा संभाव्य खेळाडू अभिषेक फुगे या स्थानिक खेळाडूने परभणीच्या तन्वीर शेख याला केवळ वीस सेकंदांत गारद केले. तथापि नंतरच्या फेरीत त्याला उस्मानाबादच्या राहुल भांडवलकर याने त्याच्यावर ९-२ असा सहज विजय मिळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:39 am

Web Title: maharashtra kesari wrestling tournament chandrahar patil challenge over
Next Stories
1 उच्च न्यायालयाचा शरद पवारांना तूर्त दिलासा
2 एमसीएकडून सचिनचा आज सत्कार
3 मुंबईच्या रणजी संघात प्रवीण तांबे
Just Now!
X