स्पध्रेची वैधता तपासण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला पत्र
भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या दोन समांतर संघटना अस्तित्वात आल्यामुळे सुरू झालेला वाद महाराष्ट्रातील खेळाडूंच्या मुळावर उठला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठीची निवड चाचणी आणि राष्ट्रीय स्पर्धापासून महाराष्ट्राच्या खेळाडूंना दूर ठेवण्याचा खेळ सध्या सुरू आहे. पुढील महिन्यात भावनगर, गुजरात येथे होणाऱ्या १६ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय स्पध्रेला महाराष्ट्र संघाला पाठवायचे की नाही, याबाबत नुकतीच महाराष्ट्र बास्केबॉल संघटनेच्या कार्यकारिणीची गुप्त बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे, महाराष्ट्राच्या खेळाडूंना स्पध्रेला मुकावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या स्पध्रेला महाराष्ट्राचा संघ न पाठवण्याचा डाव संघटनेकडून आखला जात असल्याचे समजते.
के. गोविंदराज आणि पूनम महाजन यांच्यापैकी कोणाची संघटना अधिकृत हा वादाचा मुद्दा असला तरी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने (फिबा) गोविंदराज यांच्या संघटनेला मान्यता दिलेली आहे, तर महाजन यांच्या संघटनेला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) मान्यता आहे. तसेच महाजन या महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अध्यक्ष असल्यामुळे गोविंदराज गटाला राज्य संघटनेकडून विरोध होणे साहजिकच आहे. गोविंदराज यांच्या संघटनेने १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत युवा बास्केटबॉल स्पध्रेचे आयोजन केले आहे. त्यात सहभाग घेण्यासाठी सर्व राज्य संघटनांना ५ ऑगस्ट रोजी मेलद्वारे कळविले होते. या स्पध्रेत सहभाग निश्चित करण्यासाठी १७ ऑगस्ट अंतिम तारीख असल्याचेही स्पष्ट नमूद केलेले असतानाही महाराष्ट्र संघटनेकडून हालचाली होताना दिसत नाही.
याबाबत संघटनेचे सचिव गोविंद कुमार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘राष्ट्रीय स्थरावर दोन संघटना कार्यरत असल्यामुळे गोविंदराज यांच्या संघटनेने आयोजित केलेली ही स्पर्धा अधिकृत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला सोमवारी पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून ही स्पर्धा अधिकृत असल्याचे उत्तर मिळाल्यास महाराष्ट्राचे संघ पाठविण्यात येतील. रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष पूनम महाजन यांनी संघ पाठविण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही आम्ही क्रीडा मंत्रालयाची प्रतीक्षा करत आहोत. राहिला प्रश्न अंतिम तारखेचा आम्ही अखेरच्या क्षणालाही संघ पाठवण्याची तयारी केली आहे.’’ मात्र, राज्य संघटनेची ही दुटप्पी भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘‘हा पत्रव्यवहार जाणूनबजून करण्यात येत आहे. या संघटनेच्या स्पर्धा आयोजनाबाबत साशंकता असती, तर गोविंदराज यांच्या संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संघ निवड चाचणी स्पध्रेला महाराष्ट्राचे खेळाडू गेले कसे आणि त्यातील काहींची संघात निवडही झाली. त्या वेळी यांनी आक्षेप का घेतला नाही,’’ असा सवाल सूत्रांकडून करण्यात येत आहे.
याबाबत कुमार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘त्या निवड चाचणी स्पर्धा खुल्या होत्या. त्यात राज्य संघटनेचा काहीच हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे आमच्यावरील आरोप चुकीचे आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पध्रेकरिता महाराष्ट्राचा संभाव्य २० जणांचा संघ तयार आहे. क्रीडा मंत्रालयाकडून उत्तर मिळाल्यास तो या स्पध्रेत पाठवला जाईल. खेळाडूंचे कोणत्याही प्रकारे नुकसान आम्हाला करायचे नाही.’’ पण, हे उत्तर येणार कधी आणि खेळाडूंना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार कसा, याची ठोस उत्तरे राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देता आली नाही. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता राष्ट्रीय स्पध्रेत महाराष्ट्राच्या संघाचा सहभाग अनिश्चितच समजला जात आहे.

महाराष्ट्र सोडून या स्पध्रेसाठी २१ राज्यांनी सहभाग निश्चित केला आहे. आम्ही पत्रात १७ ऑगस्ट अंतिम तारीख ठेवली होती, कारण खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था, आदी गोष्टींचे नियोजन करणे आम्हाला सोपे जाईल. मात्र, महाराष्ट्राने अखेरच्या क्षणाला जरी सहभाग घेण्याचे निश्चित केले, तरी त्यांचे स्वागत असेल.
– चंदर मुखी शर्मा, सचिव, भारतीय  बास्केटबॉल महासंघ