उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील काकरी येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या फेडरेशन चषक कुमारांच्या कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राच्या महिला संघाची पाटी कोरी राहिली. महिन्याभरापूर्वी झालेल्या कुमार गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत याच महाराष्ट्राच्या संघाने उपविजेतेपद पटकावले होते. कर्णधार सोनाली शिंगटे आणि पौर्णिमा जेधे या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या खेळाडू पहिल्या सामन्याला अनुपस्थित राहिल्यामुळे संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असे कबड्डीवर्तुळात म्हटले जात आहे.
फेडरेशन चषक कबड्डी स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जानेवारीला झालेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या लढतीला सोनाली आणि पौर्णिमा या दोघीही अनुपस्थित होत्या. महाराष्ट्राचा संघ साईविरुद्धचा सामना ३ गुणांनी हरला. स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी या दोघी सायंकाळी स्पध्रेच्या स्थळी दाखल झाल्या. त्यानंतर स्पध्रेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा संघ दिल्लीकडून हरला. महाराष्ट्राच्या गटातील पश्चिम बंगालचा चौथा संघ स्पध्रेला गैरहजर राहिला. परंतु महाराष्ट्राचा संघ एकही सामना जिंकू न शकल्यामुळे साई आणि दिल्लीने बाद फेरीत आगेकूच केली. महाराष्ट्राच्या संघाला मात्र साखळीतच गारद होण्याची
नामुष्की ओढवली. हाच
महाराष्ट्राचा संघ कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या अंतिम फेरीत हरयाणाकडून फक्त एका गुणाने पराभूत झाल्यामुळे उपविजेता ठरला होता.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:च्या व्यावसायिक संघाकडून या मुली मुंबईतील एका महत्त्वाच्या स्पध्रेत खेळत होत्या, परंतु तरीही पहिल्या सामन्याला हजेरी लावण्यासाठी त्या विमानाने फेडरेशन चषक स्पध्रेला निघाल्या. मात्र उशिरा पोहोचल्यामुळे त्या या सामन्याला मुकल्या.
कुमार गटाच्या फेडरेशन चषक स्पध्रेतील महाराष्ट्राच्या कामगिरीचा आम्ही आढावा घेत आहोत. या स्पध्रेसंदर्भात कोणाकडूनही नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-दत्ता पाथ्रीकर (महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष)