संतोष चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पध्रेत १५ वर्षांनंतर जेतेपद पटकावण्याची चालून आलेली सुवर्णसंधी महाराष्ट्राने गमावली. गतविजेत्या सेनादल संघाने २-१ अशा फरकाने महाराष्ट्रावर मात केली. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळविण्यात आली होती.
मोतीबागेतील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मदानावर रविवारी रंगलेल्या सामन्यात ८व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या अभिषेक आंबेडकरने ‘डी’ क्षेत्राच्या आतून गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू सेनादलाचा गोलरक्षक शिबान राजने अडवला. पुढील मिनिटालाही अभिषेकचा गोल करण्याचा प्रयत्न राजने हाणून पाडला. मात्र, १४व्या मिनिटाला मार्टनि स्टेफिनच्या पासवर उजव्या बाजूला असलेल्या मोहम्मद शाहबाजने गोल करत महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्राला फार काळ ही आघाडी टिकवता आली नाही. सेनादलाच्या अर्जुन टुडोने २५व्या मिनिटाला गोल करून सामना १-१ ने बरोबरीत आणला. अर्जुनने या चुरशीच्या सामन्यात ३६व्या मिनिटाला आणखी एक गोल करून सेनादलाला २-१ ची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत सेनादलाने सामन्यावर मजबूत पकड बनवली होती. अखेपर्यंत सेनादलाने २-१ अशी आघाडी कायम राखली.