News Flash

महाराष्ट्र ‘मिशन वन मिलियन’ला दुप्पट यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई जिमखाना येथे या उपक्रमाचे उद्घाटन झाले

राज्य सरकारच्यावतीने आयाजित ‘मिशन वन मिलियन’ या उपक्रमाला अपेक्षेपक्षा दुप्पट प्रतिसाद मिळाला

राज्यात २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा फुटबॉल खेळात सहभाग

पुढील महिन्यात होणाऱ्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय झालेला पाहायला मिळाला. राज्य सरकारच्यावतीने आयाजित ‘मिशन वन मिलियन’ या उपक्रमाला अपेक्षेपक्षा दुप्पट प्रतिसाद मिळाला आणि शुक्रवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांमधील एकूण २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मैदानात उतरून फुटबॉल खेळ खेळला. यामध्ये १६ लाख २९,१७९ मुलांचा, तर ९ लाख ३३,१७४ मुलींचा सहभाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई जिमखाना येथे या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी क्रीडामंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सुमारे ३३ हजार शाळांमध्ये प्रत्येकी ३ चेंडूंचे वाटप करण्यात आले होते. नाशिक व जळगाव येथे विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. जळगावमध्ये शासकीय कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी विरुद्ध शासकीय अधिकारी यांचे सामने झाले. या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून या सामन्यांचे चित्रीकरण करण्यात आले. धुळ्यामध्ये साक्री तालुक्यात झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांनी सामन्यांचा आनंद लुटला, तर येथील अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रथमच मुली फुटबॉल खेळल्या. नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी, डोंगराळ भागांमध्ये फुटबॉल खेळण्यात आला. कोल्हापूरमध्ये ४५ क्लब्सनी तीन दिवसांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ओरस सेंट्रल जेलचे अधिकारी विरुद्ध कैदी यांचा मैत्रीपूर्ण सामना रंगला. देवगड बीच येथे नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्या बीच फुटबॉल स्पर्धा झाल्या. अहमदनगरमध्ये मूकबधिर मुलांच्या स्पर्धा झाल्या. तसेच स्नेहालय संस्थेतील अनाथ मुलांचीही फुटबॉलची स्पर्धा झाली. सोलापूर जिल्ह्य़ात पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी वयोवृद्ध जॉगर्स ग्रुपच्या फुटबॉल स्पर्धेचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. मुंबईसह राज्यात शाळा, सेवाभावी संस्था, क्रीडा संघटना, क्लब्ज, महाविद्यालयीन विद्यार्थी, डबेवाले, दिव्यांग विद्यार्थी, आदिवासी, शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आदी फुटबॉल व क्रीडाप्रेमींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

०८ 

मुंबई जिमखाना येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी आठ संघांचे वेगवेगळे फुटबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुद्ध राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाइंड असोसिएशनचे विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ आदी संघांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:50 am

Web Title: maharashtra mission 1 million initiative get huge response
Next Stories
1 भारतीय महिला हॉकी संघाची पुन्हा हाराकिरी
2 शरथची निराशाजनक कामगिरी
3 बीसीसीआयमध्ये कोणतीही ‘सेटिंग’ नव्हती म्हणून कोच झालो नाही-सेहवाग
Just Now!
X