अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत उत्तर प्रदेशवर १२ धावांनी मात

दिल्ली : डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावच्या चमकदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने गुरुवारपासून सुरू झालेल्या मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘इ’ गटातील पहिल्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशवर १२ धावांनी मात करीत विजयाचे संपूर्ण ४ गुण मिळवले.

सलामीवीर फलंदाज समर्थ सिंगने (९३) अखेरच्या षटकापर्यंत झुंज देऊनही उत्तर प्रदेशला पराभव पत्करावा लागला.

उत्तर प्रदेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातर्फे कर्णधार नौशाद शेख (४१) आणि निखिल नाईक (नाबाद ४१) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे त्यांनी २० षटकांत ५ बाद १४९ अशी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात सत्यजित व समद फल्लाह यांच्या गोलंदाजीपुढे उत्तर प्रदेशची दैना झाली. समर्थ व आकाशदीप नाथ (१०) यांना वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावा करु शकला नाही. सत्यजितने तीन षटकांच्या अंतरात तीन फलंदाजांना माघारी धाडले. अखेरच्या चार चेंडूंत १३ धावांची आवश्यकता असताना दिव्यांग हिमगणेकरने समर्थचा ९३ धावांवर त्रिफळा उडवत विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ५ बाद १४९ (निखिल नाईक नाबाद ४१, नौशाद शेख ४१; २/३४) विजयी वि. उत्तर प्रदेश : १९.३ षटकांत सर्व बाद १३७ (समर्थ सिंग ९३; सत्यजित बच्छाव ३/२३, समद फल्लाह २/३८).

पुजाराचे आक्रमक शतक

संथ फलंदाजीसाठी प्रसिद्ध चेतेश्वर पुजाराने गुरुवारी रेल्वेविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ६१ चेंडूंत तुफानी शतक झळकावले. १०० धावांच्या नाबाद खेळीत त्याने १४ चौकार व एक षटकार लगावला. मात्र त्याच्या शतकानंतरही सौराष्ट्राला रेल्वेविरुद्ध  पाच गडी व दोन चेंडू राखून पराभव पत्करावा लागला.

विदर्भाची विजयी सलामी 

नागपूर  : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात विदर्भाने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशवर तीन गडी राखून विजयी सलामी नोंदवली. अथर्व तायडेची तडाखेबाज फलंदाजी आणि रवी जांगीडची नाबाद खेळी हे दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. हिमाचलने निर्धारित २० षटकांत ८ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाला विजयासाठी पाच षटकांत ४५ धावांची आवश्यकता होती. मात्र अक्षय कर्णेवार (१७) आणि रवी जांगीडने नाबाद (२५) धावांची मोलाची खेळी साकारली. विदर्भाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७१ धावा करून विजयी सलामी दिली.