महाराष्ट्राने साखळी गटातील दुसऱ्या लढतीत गोव्यावर ३-० अशी मात करीत संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली. सलामीच्या लढतीत झारखंडला ४-१ असे सहज पराभूत करणाऱ्या महाराष्ट्राने तुल्यबळ गोव्याविरुद्धही सफाईदार विजय मिळविला. साखळी गटात हा त्यांचा लागोपाठ दुसरा विजय आहे. अन्य लढतीत तामिळनाडू संघाने झारखंडविरुद्ध ३-२ असा रोमहर्षक विजय मिळविला आणि उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या.
महाराष्ट्र व गोवा यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात गोलफलक कोराच होता. उत्तरार्धात सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला महंमद रफी याने गोव्याच्या दोन बचावरक्षकांना चकवित गोल केला आणि महाराष्ट्राचे खाते उघडले. सामन्याचा मानकरी ठरलेल्या एन.पी.प्रदीप याने ६१ व्या मिनिटाला महाराष्ट्राचा दुसरा गोल केला. त्याने फ्रीकिकचा उपयोग करीत २५ यार्ड्स अंतरावरून हा गोल नोंदविला. ७६ व्या मिनिटाला प्रेनील मेनन याने संघाचा तिसरा गोल करीत संघाची बाजू भक्कम केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:45 am