तुषार वैती

गेली अनेक वर्षे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थांगपत्ता नसताना ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेनिमित्ताने युवा खेळाडूंना आपले कर्तृत्व दाखवण्याची नामी संधी मिळाली आहे. ‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणेच घवघवीत यश मिळवले. ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि १०१ कांस्यपदकांसह एकूण २५६ पदकांची कमाई करून महाराष्ट्राने सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकावला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण-शहरी भागांतून चमक दाखवलेल्या या खेळाडूंवर सध्या कौतुकाचा वर्षांव सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रकुल-आशियाई किंवा ऑलिम्पिकसारख्या स्पर्धामध्ये एक-दोन खेळाडूंचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या खेळाडूंचा ठावठिकाणा कुठेच दिसत नाही. २०२४ आणि २०२८ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राकडून पदकविजेते खेळाडू घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण शासनदरबारी असणारी उदासीनता, पायाभूत सोयीसुविधा तसेच चांगल्या प्रशिक्षकांचा अभाव, खेळाडूंना मिळणारी आर्थिक मदत किंवा नोकऱ्या याचा ताळमेळ नसल्याने चांगली गुणवत्ता असूनही महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे पडत आहेत. ‘खेलो इंडिया’मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश राष्ट्रकुल, आशियाई किंवा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये का दिसत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा केलेला हा ऊहापोह-

हे प्राथमिक टप्प्यातील यश!

राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

महाराष्ट्रात अफाट गुणवत्ता आहे, हे ‘खेलो इंडिया’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पण हे यश आपण कुठपर्यंत नेऊन ठेवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चमकलेल्या काही खेळाडूंना २०२४च्या ऑलिम्पिकसाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाईल. पण पुढील ८-१० वर्षांपर्यंत त्यांना चांगल्या सुविधा देणेही तितकेच गरजेचे आहे. चांगला खेळाडू घडायला कित्येक वर्षे लागतात. त्यामुळे ‘खेलो इंडिया’मधील हे यश प्राथमिक म्हणून पाहायला हवे. हे अंतिम यश नव्हे, हे त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा आसपासच्या लोकांनीही लक्षात घ्यायला हवे. खेळाडूंना आता मानसन्मान मिळेल, पण खेळाडूंनीही याचा सकारात्मक फायदा उठवायला हवा. बरेचसे काम खेळाडूंनी केले असले तरी आता पुढील जबाबदारी शासनाची आहे. राज्य सरकार खेळाडूंना पैसा पुरवत असले तरी नियोजनाचा अभाव दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच प्रगती होत आहे, अनेक शोध लागत आहेत. त्यामुळे सरकारच्या विचारांचा, कार्यपद्धतीचा वेग कमी असून चालणार नाही. शासकीय पातळीवरील घडामोडींना वेग देत स्वत:ला अद्ययावत ठेवत खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा, प्रशिक्षक तसेच अन्य तज्ज्ञमंडळी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. जगातल्या वेगाशी स्पर्धा करू शकलो तरच महाराष्ट्राला यश मिळवता येईल.

शासकीय उदासीनतेचा फटका

जय कवळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव

‘खेलो इंडिया’मध्ये महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणाचे खेळाडू चमकत आहेत. पण हरयाणाच्या क्रीडाधोरणाशी महाराष्ट्राची तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही बॉक्सिंग हा खेळ पोहोचवला आहे. पण महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंना आर्थिक बाबतीत कोणतेच प्रोत्साहन मिळत नाही. खेळ जिवंत ठेवण्यासाठी सरकारकडून मिळणारी ही कौतुकाची थाप अत्यावश्यक आहे. दरवर्षी महाराष्ट्राचे ५० ते १०० बॉक्सिंगपटू पोलीसमध्ये रुजू होत आहेत. पण पोलिसांची नोकरी मिळाल्यानंतर कर्तव्यामुळे त्याचा खेळ कायमचा बंद होतो. महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी खेळांसाठी २९५ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. पण हा निधी कुठे जातो? खेळाडूंच्या भल्यासाठी हे पैसे मिळणार नसतील तर त्याचा काय उपयोग? राज्याच्या १३ कोटी जनतेसाठी आपल्याकडे बालेवाडीसारखे एकच क्रीडासंकुल आहे. महाराष्ट्राचे खेळाडू पुढे का जात नाहीत, हा प्रश्न सर्वचजण विचारतात. पण चांगले खेळाडू घडवण्याची कुणाचीही इच्छा नाही. शासकीय पातळीवर प्रचंड निराशा, उदासीनता आहे. हे चित्र कुठेतरी बदलण्याची गरज आहे.

दोन-तीन वर्षांत फरक दिसेल!

क्लॅरेन्स लोबो, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते माजी हॉकीपटू

‘खेलो इंडिया’च्या निमित्ताने देशभरातील गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. निवड समितीचा एक भाग म्हणून मला ही गुणवत्ता जवळून पारखता आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू चांगली कामगिरी करताहेत, हे बघून चांगले वाटले. देशातून चांगले क्रीडापटू घडावेत, या उद्देशाने सुरू केलेला ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पण याची फळे मिळायला वेळ लागेल. ऑलिम्पिकमध्ये भारत किंवा महाराष्ट्र कुठेच दिसत नाही, हे आतापर्यंतचे चित्र होते. पण ‘खेलो इंडिया’द्वारे देशाला आता चांगले खेळाडू मिळू लागले आहेत. पण त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्य सरकारने खेळाडूंसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केली तर पुढच्या काही वर्षांत हे चित्र बदललेले दिसेल. महाराष्ट्रात अफाट गुणवत्ता आहे, पण ती बाहेर काढण्याची आणि त्यांना घडवण्याची आवश्यकता आहे. तसे प्रयत्न झाल्यास, येत्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्राचे खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकतील.

tushar.vaity@expressindia.com