News Flash

महागणपतीच्या साक्षीने ठरणार यंदाचा ‘महाराष्ट्र श्री’

ग्रामीण भागातील युवकांना आकर्षित करण्यासाठी टिटवाळ्यात स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र श्रीचा थरार आजवर मुंबई, ठाणे, कोल्हापूर,पुणे या शहरी भागातच अधिक पाहायला मिळाला आहे. पण शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची क्रेझ आता दिवसेंदिवस ग्रामीण भागातही झपाट्याने वाढते आहे. त्त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनाही समान संधी मिळावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी, तसेच त्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या कारणासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे क्रीडा प्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्य़ा पुढाकाराने १५ व्या ‘महाराष्ट्र श्री’चे आयोजन महागणपतीच्या साक्षीने ५ आणि ६ मार्चला टिटवाळा मंदिराशेजारील तरे प्रतिष्ठानच्या मंदिरात होणार आहे. आयोजक तरे यांनी ही माहिती दिली.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही महाराष्ट्र श्री स्पर्धा भव्य दिव्य प्रमाणात होऊ शकते, हे दाखवून देण्यासाठी तरे यांनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी शरीरसौष्ठवपटूंना दिल्या जाणाऱ्या उत्तम सुविधा टिटवाळ्यातही उपलब्ध करून दिल्या आहेत. तब्बल दोनशे खेळाडूंच्या निवासासह दोन दिवस त्यांना त्यांचा आवडता खुराकही दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या महाराष्ट्र श्रीचा थाट यंदाही तसाच असेल. स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी लिलया पार पाडणाऱ्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा होणार आहे.

६ मार्चला ‘महाराष्ट्र श्री’चा अंतिम सामना रंगणार असून विजेत्याला गतवर्षीप्रमाणे दीड लाखाचा रोख पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर उपविजेत्याला ७५ हजारांचे रोख इनाम देऊन गौरविण्यात येईल. १० गटात ही स्पर्धा रंगणार असून सहा खेळाडूंना १५, १२, ८, ६, ५ आणि ३ हजार असे रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच पुरूष-महिलांचे फिजीक स्पोर्टस् आणि महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा अशा अन्य तीन गटांसह एकून १३ गटांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेतूनच २९ ते ३१ मार्चदरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या ‘भारत श्री’ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असल्याचे रोठे यांनी सांगितले.

महिलांसाठी फिजीक स्पोर्टस् आणि शरीरसौष्ठव असे दोन्ही गट या स्पर्धेत खेळविले जाणार आहेत. मिस मुंबई स्पर्धेतच सात खेळाडूंच्या सहभागामुळे मिस महाराष्ट्रसाठी महिलांचा आकडा वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार या स्पर्धेत तब्बल २० पेक्षा अधिक महिला ऍथलीट खेळणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी दिली.

मुंबईचा संघ सगळ्यात बलाढ्य असला तरी स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेकडे सागर माळी, दिनेश कांबळे, अजय नायर, गणेश आंबुर्ले, संतोष शुक्ला असे तगडे खेळाडू असल्यामुळे चार वजनी गटात गटविजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. एवढेच नव्हे तर पाच वेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणाऱ्या सुनीत जाधवलाही सागर माळीविरूद्ध आपला जोर दाखवावा लागणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सलग पाच वेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणाऱ्या सुनीत जाधवला जेतेपदाचा षटकार ठोकणे फार आव्हानात्मक असेल. नवी मुंबईत झालेल्या स्पर्धेत ८५ किलो वजनी गटात सुनीत जाधवसह सागर माळी आणि महेंद्र चव्हाणसारखे तगडे खेळाडू उतरले होते. हा गटच अंतिम सामन्यासारखा होता. विशेष म्हणजे गटविजेता निवडताना सुनीत जाधवऐवजी सागर माळी आणि महेंद्र चव्हाणची कंपेरिझन घेण्यात आली. अखेर सागरने गटविजेतेपद जिंकत आपले जेतेपदही निश्चित केले. त्यामुळे या स्पर्धेसाठी महेंद्र पगडे आणि अनिल बिलावा हे जबरदस्त तयारीतले खेळाडूही उतरत असल्यामुळे सुनीत जेतेपदाचा सिक्सर मारतो हे पाहणे महत्वाचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 1:00 pm

Web Title: maharashtra shree championship organised in titwala this year to encourage body building in rural areas
Next Stories
1 Video : अजब गजब विकेट! ‘असा’ झेल कधी पाहिलाय का?
2 Video : भन्नाट सेलिब्रेशन! आधी षटकार मग त्याच गोलंदाजाला मारला सलाम
3 वादविवादामुळे अधिक परिपक्व झालो – लोकेश राहुल
Just Now!
X