यंदा अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत झालेल्या महाराष्ट्राच्या पराभवाची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने गांभीर्याने दखल घेतली आहे. रविवारी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या अपयशाचे विश्लेषण करण्यासाठी चौकशी समिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती आपला अहवाल असोसिएशनच्या पुढील कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सादर करणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले.
पाटणा येथे झालेल्या अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी घोर निराशा केली. त्यामुळे या पराभवाबाबत विविध स्तरांवर आक्षेप घेण्यात
आले.  ‘‘खेळाडू खराब कामगिरीमुळे हरले की जाणीवपूर्वक, याबाबत शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळेच आम्ही ही शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करीत आहोत,’’ असे पाटील यांनी सांगितले. या सामन्यांच्या सीडीसुद्धा मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.