‘‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी असताना देशाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने २०व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेचे यजमानपद महत्त्वाचे होते. ही स्पर्धा चेन्नईत झाली असती तर श्रीलंकेचे खेळाडू सहभागी झाले नसते. परंतु महाराष्ट्र शासनाने फक्त २१ दिवसांत या स्पध्रेची जय्यत तयारी केली. पुण्यात ३ ते ७ जुलैदरम्यान होणाऱ्या या स्पध्रेचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे,’’ अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
‘‘कोणत्याही अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेच्या यशासाठी एखादी सरकारी यंत्रणा कार्यरत असल्याचे मी कधीच पाहिले नव्हते. परंतु या अजिंक्यपद स्पध्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने हे दाखवून दिले. त्यामुळे ही सर्वोत्तम आशियाई अजिंक्यपद स्पर्धा होईल,’’ असे मत राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी व्यक्त केले.
‘‘चेन्नईने यजमानपद नाकारल्यानंतर दिल्ली आणि झारखंडकडे या स्पध्रेचे आव्हान स्वीकारले नाही. परंतु महाराष्ट्राने १२ जून २०१३ या दिवशी स्पध्रेच्या यजमानपदाचा निर्णय घेतला. अतिशय कमी मुदतीत आम्ही स्पध्रेची तयारी करीत आहोत. महाराष्ट्र सरकारने या स्पध्रेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आम्ही बालेवाडीत पंचतारांकित दर्जाचे क्रीडाग्राम तयार केले आहे,’’ असे वळवी यांनी सांगितले.
यावेळी सुमारिवाला म्हणाले की, ‘‘या आशियाई स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांमध्ये विजेत्या ठरणाऱ्या खेळाडूंना १० ऑगस्टपासून मॉस्कोत सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत थेट प्रवेश देण्यात येणार आहे. त्याकरिता त्यांची ‘अ’ किंवा ‘ब’ श्रेणीची पात्रता कामगिरी विचारात घेतली जाणार नाही. मॉस्कोच्या स्पध्रेच्या दृष्टीने आम्हाला आशियाई स्पध्रेच्या तारखासुद्धा पुढे ढकलता आल्या नाहीत.’’
आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेच्या निमित्ताने उंच उडीमध्ये आशियाई विक्रम नोंदविणारा मुर्ताझ इस्सा बर्शिम, बहरिनची १५०० मीटरमधील माजी विश्वविजेती मरियम युसूफ जमल, पुरुष ८००मीटरमधील अव्वल धावपटू युसूफ साद कामेल आणि रशिद रमझी (पुरुष १५०० मी.) या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.

पदार्पणातच पदक मिळविण्याचे मोनिका आथरेचे ध्येय
पुणे : वरिष्ठ गटाच्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मी प्रथमच भाग घेत असले तरी घरच्या मैदानावर पदक मिळविण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असा आत्मविश्वास भारताची उदयोन्मुख धावपटू मोनिका आथरे हिने व्यक्त केला. ‘‘चेन्नईमधील आशियाई ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत चांगले यश मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा उठविण्याचा माझा प्रयत्न राहील. कविता राऊत, सुधा सिंग, स्वाती गाढवे यांचा आदर्श माझ्यापुढे आहे. त्यांनी मिळविलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा माझा मानस आहे,’’ असे मोनिकाने सांगितले.

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची वैशिष्टय़े
* स्थळ : शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.
* उद्घाटन : २ जुलै, सायं. ५ वा.
* स्पध्रेचा कालावधी : ३ ते ७ जुलै, २०१३
* स्पध्रेचा समारोप : ७ जुलै, सायं. ५ वा.
* सहभागी देश : ४३ (४५ सदस्य राष्ट्रे)
* खेळाडू : ५७८
* मैदानी खेळाचे क्रीडा प्रकार : ४२
* भारतीय पथक : १५० खेळाडू
* महाराष्ट्राचे खेळाडू : १०
अनिरुद्ध गुज्जन (१०० मी.), कृष्णकुमार राणे (१०० मी.), प्रतीक निनावे (२०० मी.), मोहम्मद युनूस  (५००० मी.), सिद्धांत थिंगलिया (११० मी. अडथळा शर्यत), रामचंद्रन (४०० मी. अडथळा शर्यत), के. दिलीपकुमार (डिकॅथलॉन), भाग्यश्री शिर्के (४ बाय १०० मी. रिले), कविता राऊत  (५,००० मी.), मोनिका आथरे (१०,००० मी.)