महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असून, पदाधिकाऱ्यांच्या १४ जागांसाठी एकंदर ३७ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद रिक्त केल्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीत या पदासाठी मदन पाटील, किशोर पाटील आणि संभाजी पाटील तिघे लढणार आहेत. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या सरकार्यवाहपदासाठी मोहन भावसार, रमेश देवाडिकर, मीनानाथ धानजी, गणेश शेट्टी आणि विश्वास मोरे आपले सामथ्र्य पणाला लावतील.
कार्याध्यक्षपदासाठी दत्ता पाथरीकर, प्रकाश बोराडे आणि आमदार किरण पावस्कर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर खजिनदारपदासाठी अर्जुनवीर शांताराम जाधव, गणेश शेट्टी, सुनील जाधव, मंगल पांडे आणि रवींद्र देसाई आदी मंडळी उत्सुक आहेत.
उपाध्यक्षपदासाठी राजकीय मंडळींनीच मोठय़ा संख्येने उत्सुकता दर्शविल्याचे चित्र दिसत आहे. उपाध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी सर्वाधिक ११ अर्ज आले असून, यात आमदार भाई जगताप, राधेशाम कोगटा, संभाजी पाटील, उत्तमराव इंगळे, रमेश कदम, राम मोहिते, बबनराव लोकरे, जयंत पाटील, बाबुराव चांदेरे, किरण पावसकर, गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे.
संयुक्त कार्यवाह या महत्त्वाच्या पाच जागांसाठी विश्वास मोरे, मीनानाथ धानजी, रवींद्र देसाई, सुनील जाधव, प्रकाश बोराडे, मुझफ्फर अली अब्बास अली सय्यद, उत्तमराव इंगळे, मंगल पांडे, उत्तमराव माने आणि बजरंग परदेशी यांचा समावेश आहे.