महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह पद रमेश देवाडीकर टिकवणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे सरकार्यवाह पदाबाबत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नवनिर्वाचित ठाणे कबड्डी असोसिएशनने आपल्या तीन प्रतिनिधींची नावे देताना प्रतिस्पर्धी पॅनेलच्या देवाडीकर यांना वगळल्यामुळे त्यांची अडचण झाली होती. परंतु आता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून देवाडीकर यांना प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे त्यांच्या सरकार्यवाह पदासाठीच्या मार्गातील प्राथमिक अडसर तरी दूर झाला आहे. परंतु या पदासाठी निवडणूक झाल्यास राज्यात कार्यरत असलेले तीन संघटक त्यांना आव्हान देऊ शकतील, असे खात्रीलायक वृत्त आहे.
राज्य कबड्डी असोसिएशनच्या शासकीय समितीची बैठक शनिवारी सकाळी १०.३० वाजता किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. असोसिएशनच्या नियमानुसार कार्यकारिणीतील पदाधिकारी हा संलग्न जिल्हा संघटनेचा प्रतिनिधी असणे अनिवार्य आहे. देवाडीकर यांना त्यांच्याच जिल्हा संघटनेत अनपेक्षितरीत्या पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे नियमानुसार त्यांना कार्यवाहपद सोडावे लागणार आहे. परंतु शासकीय समितीने त्यांच्या नावालाच पसंती दिल्यास ते बिनविरोधपणे सरकार्यवाह पदावर विराजमान होतील. पण याबाबत निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असोसिएशनचे कोषाध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष संभाजी पाटील व सहसचिव सुनील जाधव हे तीन पदाधिकारी या प्रतिष्ठेच्या पदासाठी उत्सुक असल्यामुळे देवाडीकर यांचे भवितव्य या बैठकीत निश्चित होईल. परंतु मराठवाडय़ासह बहुमत अद्यापही देवाडीकर यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना आपले पद टिकवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.