महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २६ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनपुढे पेचप्रसंग उभा ठाकला आहे. संघटनेने केलेल्या घटनादुरुस्तीमुळे प्रत्येक जिल्हा संघटनेच्या तीन सदस्यांमध्ये (मतदान किंवा उमेदवार) सचिवाला असणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुण्याकडील एका पदाधिकाऱ्याचे पद डावावर लावणे किंवा संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना या सदस्यांमध्ये स्थान न देणे हे दोन पर्याय त्यांच्यापुढे उरले आहेत.
राज्य कबड्डी असोसिएशनच्या मागील निवडणुकीप्रसंगी अजित पवार, बाबुराव चांदोरे आणि शांताराम जाधव हे तिघे जण पुण्याचे प्रतिनिधी होते. यापैकी चांदोरे उपाध्यक्षपदी आणि जाधव कोषाध्यक्ष पदावर निवडून आले. आता घटनादुरुस्तीमुळे मधुकर नलावडे यांना प्रतिनिधित्व देण्याशिवाय पुणे संघटनेकडे पर्याय नाही. याचप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा आदर राखल्यास स्वाभाविकपणे चांदोरे किंवा जाधव यांच्यापैकी एकालाच प्रतिनिधित्व मिळू शकेल. परिणामी प्रतिनिधित्व न मिळालेल्या व्यक्तीचे पदसुद्धा खालसा होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे कबड्डी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
अर्जुन पुरस्कारविजेते जाधव सरकार्यवाहपदासाठी इच्छुक आहे. याकरिता ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. मुळातच राजकीय क्षेत्रात वावरणारे चांदोरे कबड्डीतील राजकारणाचा कानोसा घेत आहेत. मात्र निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला कोणती पदे मिळू शकतात, अशी भविष्यकालीन जोखीम पत्करणे पुण्याला सद्य:स्थितीत परवडणारे नाही. त्यामुळे सचिवांना स्थान देण्यासाठी पवार यांनीच प्रतिनिधित्व नाकारल्यास ते संघटनेच्या सोयीचे ठरू शकेल, असे कबड्डीतील जाणकारांचे म्हणणे आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 3:28 am