सोलापुरात आजपासून राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला प्रारंभ

मुंबई : हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर पुरुष आणि महिलांच्या ५६व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. गतवर्षी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्य़ांच्या संघाना यावेळी विजेतेपद राखण्यासाठी कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

श्रीकांत वल्लाकाठीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या पुरुषांची या स्पर्धेत सलामीला बलाढय़ औरंगाबादशी गाठ पडणार आहे, तर महिला संघाचा सामना नंदुरबारशी होणार आहे. त्याशिवाय पुरुष गटाच्या मुंबई उपनगरविरुद्ध रत्नागिरी या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर ठाण्याच्या महिला संघासमोर पहिल्या लढतीत लातूरचे आव्हान असेल.

१२ ते १५ डिसेंबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटात २४, तर महिलांच्या गटात २० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी तीन संघांना आठ गटांत विभागण्यात आले असून या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर छत्तीसगड येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची निवड करण्यात येणार आहे.

पुरुष गटवारी

अ-गट : मुंबई उपनगर, जळगाव, रत्नागिरी; ब-गट : पुणे, रायगड, धुळे; क-गट : सांगली, बीड, लातूर; ड-गट : मुंबई, सातारा औरंगाबाद; इ-गट : ठाणे, परभणी, नंदुरबार; फ-गट : उस्मानाबाद, पालघर, नांदेड; ग-गट : सोलापूर, हिंगोली, जालना; ह-गट : नाशिक, अहमदनगर, सिंधुदुर्ग

महिला गटवारी

अ-गट : ठाणे, बीड, लातूर; ब-गट : रत्नागिरी, रायगड, नाशिक; क-गट : पुणे, धुळे; ड-गट : उस्मानाबद, पालघर, जालना; इ-गट : सातारा, सोलापूर; फ-गट : मुंबई, नंदुरबार; ग-गट : अहमदनगर, औरंगाबाद; ह-गट : सांगली, मुबंई उपनगर, सिंधुदुर्ग

चार महिला संघांची माघार

नांदेड, हिंगोली, जळगाव आणि परभणी या चार जिल्ह्य़ांच्या महिला संघांनी स्पर्धेला अवघा एक दिवस शिल्लक असताना माघार घेतली आहे. ‘‘पुरेसे खेळाडू उपलब्ध नसणे आणि खेळाडूंना योग्य सोयी-सुविधांचा अभाव यामुळे काही महिला संघांनी माघार घेतली असावी. परंतु यामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकात काहीही बदल करण्यात येणार नसून ज्या संघाच्या प्रतिस्पध्र्यानी माघार घेतली आहे, त्या संघांना थेट पुढील फेरीत प्रवेश देण्यात येणार आहे,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.