17 December 2017

News Flash

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : महाराष्ट्राच्या पुरुष संघाला जेतेपद

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत कर्नाटकवर सहज मात करून ४२व्या वरिष्ठ राष्ट्रीय

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 1, 2013 12:04 PM

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत कर्नाटकवर सहज मात करून ४२व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य अंजिक्यपद कॅरम स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. महिलांना मात्र अंतिम फेरीत तामिळनाडूकडून पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राच्या पुरुषांनी एकेरीच्या पहिल्या दोन्ही लढती जिंकून जेतेपद पटकावले. गणेश चावरे आणि रियाझ अकबर अली यांनी महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गणेश चावरेने कर्नाटकच्या जाहीर पाशा याचा २५-२०, ६-२५, २५-६ असा पराभव करून महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली. रियाझ अकबर अलीने बी. राजेश याला २५-२२, २५-१२ असे सहज पराभूत करून महाराष्ट्राला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. मात्र औपचारिक ठरलेल्या दुहेरीच्या लढतीत एम. विनोद आणि आर. शिवकुमार या कर्नाटकच्या जोडीने रहीम खान आणि विनोद बारिया या महाराष्ट्राच्या जोडीला २५-१५, २५-१० असे हरवले.
महिलांमध्ये जेतेपदासाठी अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. प्रीती खेडेकर हिने तामिळनाडूच्या जी. रेवती हिचा ६-२५, २५-९, २५-१३ असा धुव्वा उडवत महाराष्ट्राला पहिल्या एकेरी सामन्यात विजय मिळवून दिला. ही अंतिम लढत जिंकून महाराष्ट्र दुहेरी मुकुट परिधान करेल, असेच वाटत होते. पण तामिळनाडूच्या खेळाडूंनी पुढील दोन्ही लढती जिंकून महाराष्ट्राच्या महिला संघाकडून जेतेपद हिरावून घेतले. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मैत्रेयी गोगटे हिला पी. सोन्नारसी हिच्याकडून १६-२५, १२-२५ असा पराभव पत्करला. त्यामुळे सर्वाच्या नजरा दुहेरीच्या लढतीकडे लागल्या होत्या. लिना चव्हाण आणि प्रगती चव्हाण या जोडीकडून महाराष्ट्राला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पी. जयश्री-के. नागज्योती यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. तामिळनाडूने निर्णायक लढतीत २५-८, २५-० असा विजय मिळविल्याने महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

First Published on March 1, 2013 12:04 pm

Web Title: maharashtra team win in national carrom competition