कर्णधार राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी निर्णायक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कर्णधार राहुल त्रिपाठीच्या दिमाखदार अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्याचा सात गडी आणि चार चेंडू राखून पराभव करताना सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात पाचव्या विजयाची नोंद केली. आता महाराष्ट्राचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

बडोद्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर केदार देवधर (३८) आणि मितेश पटेल (२९) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. याशिवाय दीपक हुडा आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. महाराष्ट्राच्या अझिम काझीने ३३ धावांत २ बळी मिळवले.

त्यानंतर, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांनी ९८ धावांची दमदार सलामी देत महाराष्ट्राच्या विजयाचा पाया रचला. अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असताना ऋतुराजला (४८) लुकमान मेरीवालाने पायचीत केले. राहुलने ४९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ७० धावांची खेळी साकारली. नौशाद शेखरने ११ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद २१ धावा केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात महाराष्ट्राला विजयावर शिक्कामोर्तब करता आले.

संक्षिप्त धावफलक

बडोदा : २० षटकांत ७ बाद १६३ (केदार देवधर ३८, मितेश पटेल २९; अझिम काझी २/३३) पराभूत वि. महाराष्ट्र : १९.२ षटकांत ३ बाद १६४ (राहुल त्रिपाठी ७०, ऋतुराज गायकवाड ४८; दीपक हुडा १/९)