राहुल त्रिपाठीचे नाबाद शतक आणि त्याने अंकित बावणेच्या साथीने केलेली नाबाद शतकी भागीदारी यामुळेच महाराष्ट्राला बंगालविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३ बाद २९६ धावांपर्यंत पोहोचता आले.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बंगालने कालच्याच ५२८ धावांवर डाव घोषित केला. महाराष्ट्राने पहिले दोन फलंदाज ६९ धावांत गमावले, मात्र त्यानंतर त्रिपाठीने संग्राम अतितकरच्या साथीने संघाचा डाव सावरला. अतितकरने शानदार अर्धशतक टोलवले. त्याच्या जागी आलेल्या बावणेनेही त्रिपाठीला आत्मविश्वासाने साथ दिली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्रिपाठीने या मोसमातील दुसरे रणजी शतक साकारताना नाबाद ११६ धावा केल्या.
स्वप्निल गुगळे व हर्षद खडिवाले यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या डावास सुरुवात केली, मात्र केवळ पाच धावांवर खडिवालेला तंबूचा रस्ता पकडावा लागला. गुगळेला स्थिरावण्यापूर्वीच मैदान सोडावे लागले. तो केवळ ३५ धावांवर बाद झाला. महाराष्ट्राच्या डावाची जबाबदारी अतितकर व त्रिपाठी यांच्यावर आली. त्रिपाठीने या मोसमात अनेक वेळा महाराष्ट्राचा डाव सावरला आहे. अतितकर व त्रिपाठी यांनी शैलीदार खेळ करीत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भर घातली. अतितकरने सहा चौकारांसह ६९ धावा केल्या. त्रिपाठीने त्यानंतर बावणेसोबत १३९ धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळेच महाराष्ट्राला आश्वासक धावसंख्या रचता आली. त्रिपाठीने तीनशे मिनिटांच्या खेळात नाबाद ११६ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १३ चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. बावणे याने आठ चौकारांसह नाबाद ५९ धावा केल्या.
सामन्याचा बुधवारी शेवटचा दिवस असून दोन्ही संघांना पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची संधी आहे. महाराष्ट्राकडे शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजी आहे. घरच्या खेळपट्टीचा फायदा ते कसे घेतात, याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
संक्षिप्त धावफलक
बंगाल (पहिला डाव) : ८ बाद ५२८ डाव घोषित विरुद्ध महाराष्ट्र (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद २९६ (संग्राम अतितकर ६९, राहुल त्रिपाठी खेळत आहे ११६, अंकित बावणे खेळत आहे ५९; अशोक दिंडा २/७७)