मयांकच्या शानदार फलंदाजीमुळे कर्नाटकचा आठ गडी राखून विजय

मयांक अगरवालची तुफानी फटकेबाजी आणि रोहन कदमच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला आठ गडी व नऊ चेंडू राखून धूळ चारत विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

नौशाद शेख (नाबाद ६९) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (३०) यांच्या बहुमूल्य योगदानामुळे महाराष्ट्राने निर्धारित २० षटकांत ४ बाद १५५ धावा अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. अभिमन्यू मिथुनने दोन, तर केसी करिअप्पा व जगदीश सुचित यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत महाराष्ट्राला रोखले.

प्रत्युत्तरात कर्नाटकने बेलूर शरथला (२) लवकर गमावले. मात्र त्यानंतर मयांकने अवघ्या ५७ चेंडूंत सहा चौकार व तीन षटकारांसह नाबाद ८५ धावांची खेळी साकारत कर्नाटकच्या विजयाचा पाया रचला. त्याने दुसऱ्या गडय़ासाठी रोहनसह ९२ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राच्या गोलंदाजांना सामन्यात परतण्याची संधीच उपलब्ध होऊ दिली नाही. रोहन (६०) बाद झाल्यानंतरही करुण नायरच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ५३ धावा जोडून मयांकने कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कर्नाटकने विजयी लक्ष्य १८.३ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ४ बाद १५५ (नौशाद शेख ६९, राहुल त्रिपाठी ३०; अभिमन्यू मिथून २/२४) पराभूत वि. कर्नाटक : १८.३ षटकांत २ बाद १५९ (मयांक अगरवाल नाबाद ८५, रोहन कदम ६०; समद फल्लाह १/३३).