राज्याचे क्रीडामंत्री आशीष शेलार यांचा संकल्प

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मिशन ऑलिम्पिक २०२४’मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी देशाला २५ पदके जिंकून देण्याचा संकल्प सोडला आहे. राज्यातील खेळाडूंच्या, तरुणांच्या आणि जनतेच्या मदतीने हा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी व्यक्त केला.

‘मिशन ऑलिम्पिक’ डोळ्यांसमोर ठेवत ‘हा निश्चय.. दृढनिश्चय.. महाराष्ट्राचा!’ या रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्यासह अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ क्रीडापटूंचा गौरव करण्यात आला. यावेळी शेलार म्हणाले, ‘‘हा प्रवास खडतर आहे आणि त्यासाठी संपूर्ण राज्याला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. आवश्यक ती स्थिती क्रीडा जगतात निर्माण करावी लागेल. अमेरिका, चीन, सिंगापूर यांच्यासारख्या देशात ६०-६५ टक्के लोकांना खेळांबद्दल माहिती आणि औत्सुक्य असते तर प्रत्यक्ष खेळाडूंचे त्याच्या देशातील प्रमाण हे लोकसंख्येच्या ३५ टक्के आहे. आपल्याकडे ६१ टक्के लोकांना खेळात रुची असते. पण प्रत्यक्ष खेळातील सहभाग हा लोकसंख्येच्या फक्त १ टक्के असतो. हे चित्र बदलण्याची गरज आहे.’’

‘‘शासनाने ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. गेल्याच महिन्यात पुणे येथे बालेवाडी येथे आम्ही ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला ५० लाख रुपयांचा निधी तयारीसाठी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. अशी मदत करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. महाराष्ट्राने यंदाच्या अर्थसंकल्पात १५०० कोटी रुपयांची तरतूद तालुका आणि जिल्हा पातळीवर क्रीडासंकुल उभारणीसाठी मंजूर केली आहे. ही क्रीडा संकुले उभारणीसाठी आणि ती कशी चालवावीत, यासाठी आम्ही योजना आखत आहोत. त्या माध्यमातून महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू निर्माण होऊ  शकतील. मुलांनी त्यासाठी आपली प्रेरणेची ज्योत धगधगत ठेवली पाहिजे,’’ असे शेलार यांनी सांगितले.