गुवाहाटी : महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली. जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने ५० मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली. मुलींमध्ये करिना शांताने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने (१७ वर्षांखालील) २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले. ५० मीटर बटरफ्लायमध्ये महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदक केनिशा गुप्ताने (१७ वर्षांखालील) मिळवून दिले.

खो-खोमध्ये महाराष्ट्राने चारही गटात उपांत्य फेरी गाठली. १७ वर्षांखालील वयोगटांच्या लढतींमध्ये मुलींमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १०-६ असा पराभव केला. याच वयोगटात मुलांमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकवर १०-४ मात केली.