अजमेर, राजस्थान येथे झालेल्या ३४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार आणि मुलींच्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी मुकुटावर नाव कोरले. दोन्ही गटांमध्ये कर्नाटकचे आव्हान मोडून काढत महाराष्ट्राने जेतेपद पटकावले.
मुलींमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकवर १०-७ असा ३ गुणांनी विजय मिळवला. प्रथम आक्रमणात महाराष्ट्राने पाच गुणांची कमाई केली. त्यानंतर संरक्षणात ३ गुण बहाल करत मध्यंतराला ३ गुणांची आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर खेळ उंचावत विजयावर शिक्कामोर्तब केले. श्वेता गवळीने २.२० आणि १.३० मिनिटे संरक्षण केले. प्रियांका भोपीने २.२०, २.३० मिनिटे संरक्षण करताना ३ गडीही बाद केले. ऐश्वर्या सावंतने २.१०, २ मिनिटे संरक्षण करताना एक गडीही बाद केला. प्रणाली बेनके, शीतल भोर आणि कविता घाणेकर यांनी तिला सुरेख साथ दिली.
कुमार गटात महाराष्ट्राने कर्नाटकवर २५-८ असा एक डाव आणि ७ गुणांनी मात करत दणदणीत विजय मिळवला. मध्यंतरालाच महाराष्ट्राने १९ गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढवत दिमाखदार विजय साकारला. स्वप्निल चिकणेने १.२०, २.०० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. सागर घागने २.२०, २.३० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले. अनिकेत पोटेने २.३० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. मुलींमध्ये सवरेत्कृष्ट खेळाडूसाठीचा जानकी पुरस्कार रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने पटकावला आणि कुमार गटात वीर अभिमन्यू पुरस्काराने नाशिकच्या स्वप्निल चिकणेला गौरवण्यात आले.