राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांचा इशारा
महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीगच्या (महाकबड्डी) दुसऱ्या पर्वाची घोषणा संयोजकांनी केल्यानंतर २४ तासांत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने ही स्पर्धा अनधिकृत ठरवली आहे. खेळाडूंची थकबाकी दिल्याशिवाय संघटनेकडून महाकबड्डीला मान्यता दिली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिला आहे.
‘‘खेळाडू हा कोणत्याही खेळाचा महत्त्वाचा घटक असतो. त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आष्टी येथे झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही खेळाडूंची थकबाकी दिल्याशिवाय महाकबड्डीच्या दुसऱ्या पर्वाला मान्यता न देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसारे स्पध्रेला आम्ही मान्यता दिलेली नाही,’’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.
महाकबड्डी लीगचा दुसरा हंगाम १२ ते २९ जानेवारी या कालावधीत रंगणार आहे. यासंदर्भातील काही महत्त्वाच्या घोषणा संयोजकांकडून करण्यात आल्या. मात्र याबाबत पाटील यांनी अनभिज्ञता प्रकट केली. ते म्हणाले, ‘‘खेळाडूंचे मानधन दिल्यानंतर मग आमच्याशी तारखांबाबत चर्चा करावी. त्यानंतरच आम्ही दुसऱ्या हंगामाला मान्यता देऊ.’’
राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी आठवडय़ाभरात सर्व खेळाडूंना पैसे मिळणार आहेत, असे आश्वासन दिले आहे. तथापि, महाकबड्डी लीगच्या पहिल्या हंगामातील तक्रारींसंदर्भात चौकशी करण्यासाठी असोसिएशनने प्रताप शिंदे, विजय पाथ्रीकर आणि आस्वाद पाटील यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. मात्र त्यांचा अहवाल सादर करण्यापूर्वी दुसऱ्या महाकबड्डीच्या हंगामाची घोषणा झाल्यामुळे कबड्डीवर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र महाकबड्डीचे मानधन मिळालेले नाही, अशी कुठल्याही खेळाडूने लेखी तक्रार केलेली नसल्याचे दत्ता पाथ्रीकर यांनी सांगितले.

खेळाडूंच्या मानधनाशी ‘गॉडविक’चा थेट संबंध नाही
‘‘खेळाडूंचा करार हा संघमालकांशी होतो. त्यामुळे खेळाडूंचे मानधन देण्याची जबाबदारी संघमालकांची होती. गॉडविक कंपनी किंवा संघटनेचा याबाबत कोणताही थेट संबंध नाही. परंतु २५ तारखेपर्यंत सर्व खेळाडूंचे मानधन देण्यास संघमालकांना सांगण्यात आले आहे,’’ असे गॉडविक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मेहता यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘गॉडविक कंपनीने महाकबड्डीबाबत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी पाच वर्षांचा करार केल्यामुळे त्याचे पूर्ण अधिकार आमच्याकडे आहेत. यात आम्ही महाकबड्डीचे दहा हंगाम खेळवणार आहोत. त्याकरिता गॉडविक कंपनी वर्षांला ठरावीक रक्कम देण्यासाठी राज्य कबड्डी असोसिएशनशी बांधील आहे. महाकबड्डीच्या पहिल्या हंगामाची रक्कम आम्ही संघटनेला दिलेली आहे.’’
‘‘महाकबड्डीच्या दुसऱ्या हंगामासाठी राज्य कबड्डी असोसिएशननेच दत्ता पाथ्रीकर यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पुण्यात २१ नोव्हेंबरला झालेल्या संघमालक आणि पाथ्रीकर यांच्या बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली आहे,’’ असे मेहता यांनी सांगितले. पहिल्या हंगामातील सामनावीर पुरस्काराची रक्कम बाकी होती. ते धनादेश लवकरच खेळाडूंना देण्यात येणार आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.