मुकुंद धस

राष्ट्रीय उपकनिष्ठ बास्केटबॉल स्पर्धा

महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी ठरला. राज्याच्या मुला-मुलींनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना लीलया हरवून हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे सुरू असलेल्या ४५व्या राष्ट्रीय उपकनिष्ठ बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. मुलांनी जम्मू आणि काश्मीरचा ८४-२४ असा धुव्वा उडवून क गटाचे विजेतेपद पटकावण्यासाठी आगेकूच केली. बुधवारी होणाऱ्या सामन्यात यजमान हिमाचलचा पराभव केल्यास त्यांना गटविजेतेपद पटकावता येईल.

या एकतर्फी लढतीत कर्णधार देव प्रेमीने सुरुवातीलाच सलग ७ गुण नोंदवून आपली छाप पाडली. पहिल्या सत्रातील २७-८ अशा आघाडीनंतर सामन्यात काहीच प्रतिकार न झाल्याने महाराष्ट्राला आपला पहिला विजय नोंदवताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. सैफ शेख (१७ गुण), यशवर्धन जाधव (१४ गुण), देव प्रेमी (११ गुण) यांनी आक्रमणात चांगली कामगिरी केली.

मुलींनी अपेक्षेप्रमाणे उत्तर प्रदेशचा ६१-३१ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. पहिल्या सत्रात चांगली लढत देणाऱ्या उत्तर प्रदेशचा नंतर फारसा प्रभाव पडला नाही. १४-३ अशा आघाडीनंतर भूमिकाने केलेल्या चुकांचा फायदा उत्तर प्रदेशने उठवून पिछाडी १०-१४ अशी भरून काढली. दुसऱ्या सत्रात कर्णधार शोमिरा बिडयेच्या आगमनानंतर मात्र सामना एकतर्फी झाला. तिने आपल्या उंचीचा आणि अनुभवाचा फायदा घेत प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात वारंवार मुसंडी मारत बास्केट करून आपल्या सहकाऱ्यांना योग्य वेळी पासेस देऊन गुणफलक हलता ठेवला.

संध्याकाळच्या सत्रात उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार शोमिरा, मानसी, तन्वी आणि धारा फाटे यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर राज्याच्या मुलींनी गुजरातचा ७६-२६ असा पराभव केला. बुधवारी मुलींचा पंजाबविरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे.