श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप केला होता. या आरोपांनंतर श्रीलंकन क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झालं होतं. लंकेच्या तत्कालीन संघातील कर्णधार कुमार संगकारा आणि महत्वाचा खेळाडू महेला जयवर्धने यांनी अलुथगमगे यांचे आरोप फेटाळून लावत, पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. श्रीलंकन सरकारनेही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अलुथगमगे यांनी केलेल्या आरोपांविषयी चौकशी सुरु केली आहे.

श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराची चौकशी केल्यानंतर संघातील आणखी एक महत्वाचा खेळाडू महेला जयवर्धनेचीही चौकशी करण्यात आली. कोलंबो येथील सुगथदास मैदानातील क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास पथकासमोर जयवर्धने चौकशीसाठी हजर राहिला होता. यासंदर्भात त्याने आपलं म्हणणं पथकासमोर मांडल्याचं कळतंय. गुरुवारी कुमार संगकाराची चौकशी होत असताना मैदानाबाहेर श्रीलंकन कार्यकर्त्यांनी निदर्शनंही केली होती. त्यामुळे माजी क्रीडामंत्र्यांनी केलेल्या आरोपाला आता श्रीलंकेत राजकीय रंग चढताना पहायला मिळतो आहे.

आतापर्यंत क्रीडा मंत्रालयाने अलुथगमगे, तत्कालीन निवड समितीचे प्रमुख अरविंद डी-सिल्वा आणि उपुल थरंगा यांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते महिंदानंद अलुथगमगे??

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.”

२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी २७५ धावांची गरज होती. महेला जयवर्धनेचं शतक आणि तिलकरत्ने दिलशान व कुमार संगकारा यांच्या फटकेबाजीमुळे लंकेच्या संघाने हा मोठा पल्ला गाठला. धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर हे महत्वाचे खेळाडू लवकर बाद झाले. मात्र यानंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनीने संघाजी बाजू सांभाळली. धोनीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा षटकार खेचत पूर्ण केल्या आणि भारताने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.