ट्वेन्टी-२० जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचे देशात जल्लोषात स्वागत झाले. परंतु बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या पत्रकार परिषदेत अनुभवी खेळाडू महेला जयवर्धने व कुमार संगकारा यांनी जोरदार आक्रमण केले व निवृत्तीच्या वादासंदर्भात पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत आपली नाराजी प्रकट केली.
जयवर्धने म्हणाला, ‘‘आमच्या निवृत्तीबाबत एका पदाधिकाऱ्याने काही वृत्तपत्रांमध्ये जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली, ती खेदजनक होती. बांगलादेशमध्ये मला विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात प्रसारमाध्यमांना उत्तर दिले होते. मी सध्या ३७ वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत मी खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हेच मी सांगितले होते.’’ जयवर्धनेने कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव घेता म्हटले की, ‘‘आमच्याकडून या गोष्टीची शहानिशा न करता मंडळाच्या सदर पदाधिकाऱ्याने आमच्यावर ताशेरे ओढणे योग्य नाही.’’
जयवर्धने व संगकाराने निवृत्तीच्या योजनेबाबत श्रीलंका क्रिकेट मंडळाला विश्वासात घेतले नाही, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष सनथ जयसूर्या यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाराजी प्रकट केली होती. संगकारानेही मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.